Sachin Pilgaonkar | सचिन पिळगावकर यांचं निवृत्तीबद्दल महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाले “माझ्यासारखी व्यक्ती..”

नागेश कुकनूरच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिजमध्ये सचिन पिळगावकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जगदीश गौरव या काल्पनिक पात्राची भूमिका साकारत आहेत. जगदीश यांचे गायकवाड कुटुंबीयांसोबत बरेच राजकीय वैर असतात.

Sachin Pilgaonkar | सचिन पिळगावकर यांचं निवृत्तीबद्दल महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाले माझ्यासारखी व्यक्ती..
Sachin Pilgaonkar
Image Credit source: Instagram
| Updated on: May 31, 2023 | 2:35 PM

मुंबई : अभिनेते सचिन पिळगावकर हे गेल्या सहा दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. वयाच्या चौथ्या वर्षापासून ते इंडस्ट्रीत काम करत आहेत. सध्या डिस्ने प्लस हॉटस्टारवरील ‘सिटी ऑफ ड्रिम्स 3’मध्ये ते एका राजकारण्याच्या भूमिकेत आहेत. या सीरिजनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत ते निवृत्तीबद्दल व्यक्त झाले. सचिन पिळगावकर यांनी 1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी चित्रपट, टेलिव्हिजन, ओटीटी अशा माध्यमांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन, निर्मिती आणि गायन क्षेत्रातही काम केलं.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला असं वाटत काही कोणत्याही व्हिस्कीच्या बाटलीला किंवा एखाद्या कलाकाराला एक्स्पायरी डेट असते. व्हिस्कीची बाटली आणि कलाकार या दोघांचा आदर करत मी हे वक्तव्य करतोय. यात चुकीचं किंवा अपमानास्पद असं काहीच नाही. जर काही गोष्टी इथेच राहण्यासाठी असतील तर त्यांना तसंच राहू दिलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट अती करत नाही तोपर्यंत त्याच काही हानिकारक नाही. जी गोष्ट तुमच्या वयाला योग्य नसेल ती तुम्ही करू नये. माझ्यासारखी व्यक्ती निवृत्तीबद्दल विचारच करू शकत नाही.”

नागेश कुकनूरच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजमध्ये सचिन पिळगावकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जगदीश गौरव या काल्पनिक पात्राची भूमिका साकारत आहेत. जगदीश यांचे गायकवाड कुटुंबीयांसोबत बरेच राजकीय वैर असतात. या सीरिजमध्ये त्यांच्यासोबत अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, एजाज खान आणि आदिनाथ कोठारे यांच्याही भूमिका आहेत. या सीरिजचा तिसरा सिझन 26 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ या वेब सीरिजची कथा काल्पनिक आहे. ही कथा खरी नाही किंवा वास्तव जीवनापासून प्रेरित नाही. मात्र तरीही या सीरिजच्या ट्रेलरमधील अमेय गायकवाडचा एक व्हिडीओ आणि सीरिजची झलक प्रेक्षकांना हा प्रश्न विचारण्यास भाग पाडते की ‘या सीरिजच्या कथेचा ट्रॅक महाराष्ट्रात घडलेल्या सत्ताबदलाच्या घटनांपासून प्रेरित आहे का?’ याबाबत सचिन पिळगावकर म्हणाले, “मला यावर काहीच बोलायचं नाहीये पण आयुष्य हा योगायोग आहे. कालही योगायोग होता आणि आजही योगायोग आहे.”