‘अशी ही बनवाबनवी’च्या डायलॉग्सबद्दल सचिन पिळगांवकरांचा मोठा खुलासा
'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातील डायलॉग्स आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. यातील अनेक डायलॉग्स खळखळून हसायला भाग पाडतात. याच डायलॉग्सबद्दल सचिन पिळगांवकर यांनी मोठा खुलासा केला आहे.

‘अशी ही बनवाबनवी’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रचंड गाजलेला आणि आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेला चित्रपट आहे. या चित्रपटातील सर्व व्यक्तीरेखा, डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. आजही प्रेक्षक अत्यंत आवडीने हा चित्रपट पाहतात. याच चित्रपटाच्या डायलॉग्सबद्दल अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते या चित्रपटाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले.
“मी, अशोक आणि लक्ष्या.. आम्ही तिघं कायम एकत्र असायचो. आठवड्यातून किमान तीन वेळा तरी आम्ही एकमेकांना भेटायचो. एकदा एकाच्या घरी, नंतर दुसऱ्याच्या घरी.. असं करत आम्ही आठवड्यातून तीन वेळा भेटत असू. प्रत्येक फिल्ममेकरची पर्सनॅलिटी त्याच्या कामात दिसून येते. आमची ही घट्ट मैत्री ‘अशी ही बनवाबनवी’पासून सुरू झाली. हा चित्रपट बनवताना मी आणि अशोक चांगले मित्र होतोच. पण लक्ष्याची मैत्री त्यावेळी आमच्यासोबत तेवढी घट्ट नव्हती. या चित्रपटानंतर तो अधिक खुलला,” असं ते म्हणाले.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर इतका गाजेल, याची कल्पना तुम्हाला होती का, असा प्रश्न विचारल्यावर सचिन पुढे म्हणाले, “‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट बनवताना एक कल्पना आली होती की, “भट्ट जमली आहे बॉस.” त्यात मोजून तीन डायलॉग सेटवर बोलले गेले असतील. बाकी सगळे डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिले होते. वसंत सबनीस आणि मी एकत्र बसून ती स्क्रीप्ट लिहिली होती. “धनंजय माने इथेच राहतात का”, हा डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिलेला होता. मी वसंत सबनीसांना करून दाखवलं होतं की मला कसा पाहिजे? हे जागेवर सुचलेलं नाही. हे ठरवून केलेलं आहे. “हा माझा बायको पार्वती” हा अशोकचा डायलॉग, “सारखं सारखं काय त्याच झाडावर” हा माझ्या तोंडी असलेला डायलॉग आणि “जाऊबाई, नका ओ जाऊ..” हा लक्ष्याचा डायलॉग तिथे आपसूकच म्हटले गेले होते. बाकी सगळे डायलॉग स्क्रीप्टमध्ये आधीपासूनच लिहिलेले होते.”
या मुलाखतीत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचीही आठवण काढली. “लक्ष्याला मी खूप मिस करतो. ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला. तो 2004 मध्येच मी बनवला होता. जानेवारी 2005 मध्ये तो थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात मला त्याला घ्यायचं होतं. पण त्याच्या तब्येतीमुळे मी नाही घेऊ शकलो. त्याने स्वत:च मला नकार दिला होता. “तू म्हणतोयस, त्याचा मला आनंद आहे. पण मला डॉक्टरांनी परवानगी दिली नाही”, असं तो म्हणाला होता. त्यामुळे तो त्या चित्रपटात नव्हता. दुर्दैवाने डिसेंबर 2004 मध्येच तो आपल्याला सोडून गेला. फक्त मीच नाही तर प्रेक्षक आणि संपूर्ण इंडस्ट्री त्याला मिस करते. पण माझं त्याला मिस करणं हे फक्त इंडस्ट्रीला मर्यादित ठेवून नाही. माझ्या वैयक्तिक जीवनातसुद्धा मी त्याला मिस करतो,” अशा शब्दांत ते व्यक्त झाले.
