सई ताम्हणकरची फक्कड लावणी; नेटकरी म्हणाले ‘आता मार्केट गाजवणार’

अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच लावणीवर थिरकताना दिसली. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'आलेच मी' असं सईच्या या लावणीचं शीर्षक आहे. सईने फक्कड लावणी सादर केली, अशा शब्दांत प्रेक्षकांनी कौतुक केलंय.

सई ताम्हणकरची फक्कड लावणी; नेटकरी म्हणाले आता मार्केट गाजवणार
Sai Tamhankar
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 16, 2025 | 11:03 AM

लावणी हा महाराष्ट्रातील लोकनृत्याचा एक अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. मराठी प्रेक्षकांवर लावणीची प्रचंड जादू आहे. आजवर अनेक चित्रपटांमधील अनेक कलाकारांच्या लावण्या गाजल्या. आता अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर लावणी सादर करताना दिसणार आहे. ‘देवमाणूस’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातील ‘आलेच मी’ या गाण्यावर पहिल्यांदाच सईने फक्कड लावणी सादर केली आहे. हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई, ‘आलेच मी’ या गाण्यातून एका वेगळ्याच अविष्कारात प्रेक्षकांसमोर येत आहे. पारंपरिक मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात हे गीत साकारण्यात आलं असून रोहन प्रधान यांनी त्यांना साथ दिली आहे. रोहन-रोहन यांचं संगीत लाभलेलं हे गाणं तेजस देऊस्कर यांनी लिहिलं असून रोहन गोखले यांनीही अतिरिक्त गीतलेखन केलं आहे. सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ आशिष पाटील यांनी या गाण्याची नृत्यरचना केली आहे, जी अत्यंत जोशपूर्ण आणि सुरेख आहे.

सईची ही लावणी प्रदर्शित होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘खूप दिवसांनी काहीतरी वेगळा प्रयत्न केल्याचं पाहून खूप छान वाटलं. खरंच जसं गाणं आहे, तसं आलेच मी म्हणत मार्केट गाजवणार आहेस’, असं एकाने लिहिलं. तर ‘जमलं जमलं सईला’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘फक्त ही एक इच्छा होती. सई आणि तिची लावणी’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

या भूमिकेसाठी सईने तब्बल 33 तासांपेक्षा अधिक वेळ सरावाला दिला. लावणीच्या प्रत्येक नजाकतीत ती पूर्णपणे रमली आणि एक धमाकेदार परफॉर्मन्स तिने सादर केला आहे. आपल्या अनुभवाबद्दल सई म्हणाली, “‘देवमाणूस’मध्ये लावणी करणं हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. गाणं ऐकताच माझ्या पायाखालची जमीन हलली. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडलं, याबद्दल मी खूप आभारी आहे. आशिषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. प्रेक्षकांना माझे हे नवं रूप आवडेल, अशी आशा आहे.”