आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू पुन्हा अनुभवयला मिळणार, ‘सैराट’ पुन्हा प्रदर्शित होणार

'सैराट' या मराठी चित्रपटाने एकेकाळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या कधी...

आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू पुन्हा अनुभवयला मिळणार, सैराट पुन्हा प्रदर्शित होणार
Sairat
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 10, 2025 | 2:15 PM

काही सिनेमे असे असतात जे प्रदर्शित होऊन अनेक वर्ष उलटली असली तरी देखील प्रेक्षक ते आवडीने पाहातात. त्यापैकी एक सिनेमा म्हणजे ‘सैराट.’ नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला होता. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले होते. आता हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे. नुकताच ‘सैराट’ सिनेमाच्या रि-रिलिजची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया कधी पासून ‘सैराट’ सिनेमा पुन्हा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार.

‘सैराट’ या चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रेमकथा आणि कलाकारांचा नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता. अजय -अतुल यांच्या अप्रतिम संगीतानेही या चित्रपटाच्या लोकप्रियतेला हातभार लावला. संपूर्ण जगात या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली होती. या अभूतपूर्व यशानंतर ‘सैराट’ आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २१ मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ‘सैराट’च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरुने चित्रपट पुन्हा एका प्रदर्शित होणार असल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. “सैराट हा चित्रपट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आर्ची या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटाने मला फक्त ओळख नाही तर प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा दिली. ‘ सैराट’ पुन्हा प्रदर्शित होतोय याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांची कायम आभारी असेन” असे ती म्हणाली.

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित सैराट हा सिनेमा २९ एप्रिल २०१६मध्ये प्रदर्शित झाला होता. नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट केवळ ४ कोटी रुपयांमध्ये बनवला होता. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास १०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सैराटच्या यशामुळे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूचे नशीब फळफळले. त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या.