
रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक मोहित सुरीने ‘सैयारा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि गेल्या काही दिवसांपासून त्याचीच जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातून अहान पांडे आणि अनित पड्डा हे दोन नवीन चेहरे बॉलिवूड इंडस्ट्रीत आले. अहान पांडे हा अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. तर अनितने याआधी काही छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. मुख्य भूमिका म्हणून ‘सैयारा’ हा या दोघांच्या करिअरमधील पहिलाच चित्रपट आहे आणि त्यातूनच त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटावर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव होत आहे. एकीकडे थिएटरमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत, तर अनेकजण त्याच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करत आहेत. अशातच ‘सैयारा’च्या ओटीटी स्ट्रिमिंगविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
‘सैयारा’ या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत भारतात कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला होता. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 350 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. अहान पांडेनं त्याच्या करिअरमधल्या पहिल्याच चित्रपटातून कमाल केली आहे. ‘आशिकी 2’ आणि ‘एक विलन’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक मोहित सुरीने आता त्याच्या करिअरमधील सर्वांत मोठी ओपनिंग दिली आहे. ‘सैयारा’ने पहिल्याच दिवशी 21 कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘सैयारा’ने अवघ्या 8000 स्क्रिनिंगमध्ये दमदार कामगिरी केली आहे. ही सर्वसामान्य स्क्रीनसंख्येपेक्षाही कमी आहे. असं असूनही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाच्या ओटीटी पदार्पणाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘सैयारा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अद्याप प्रदर्शनाची तारीख समोर आली नसली तरी रिलीजच्या जवळपास दोन महिन्यांनंतर तो ओटीटीवर येणार असल्याचं कळतंय. सर्वसामान्यपणे एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 2 महिने आणि 21 दिवसांनी ओटीटीवर येतो. याला काही अपवादही असू शकतात.
सोशल मीडियावरही सध्या ‘सैयारा’चीच चर्चा आहे. या चित्रपटाचे रील्स, व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. एखाद्या गोष्टीची अधिकाधिक चर्चा होऊ लागली की साहजिकच त्याविषयी कुतूहल निर्माण होतं. हेच कुतूहल आणि माऊथ पब्लिसिटी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून घेऊन येत आहे.