
मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैय्यारा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अनित पड्डा सध्या ‘नॅशनल क्रश’ बनली आहे. आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. मुख्य भूमिका असलेला हा तिचा पहिलाच चित्रपट होता आणि वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी तिने ही कामगिरी केली आहे. मोठ्या पडद्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिल्यानंतर आता ती ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळणार असल्याचं कळतंय. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘न्याय’ या खऱ्या कथेवर आधारित वेब सीरिजमध्ये ती झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेखचीही भूमिका आहे.
या वेब सीरिजचं शूटिंग गेल्या वर्षीच पूर्ण झालं होतं. आता ही सीरिज लवकरच एका प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. परंतु प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की, जर अनितचा ‘सैय्यारा’ हा चित्रपट सुपरहिट झाला असेल तर ती लगेच ओटीटीकडे का वळतेय? याबाबत ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना सूत्रांनी सांगितलं की, अनितचा हा प्रोजेक्ट ‘सैय्यारा’ चित्रपट साइन करण्यापूर्वीच शूट करण्यात आला होता.
‘न्याय’ या सीरिजची कथा एका तरुणीवर आधारित आहे. जिचं एका प्रसिद्ध व्यक्तीकडून लैंगिक शोषण होतं आणि त्याच्याविरोधात ती न्यायालयात खटला लढते. यामध्ये अनितने 17 वर्षीय पीडितेची भूमिका साकारली आहे, जी केवळ समाजाच्या दबावाशीच झुंजत नाही, तर कायदेशीर समस्यांशीही लढते. यामध्ये फातिमा ही एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. याशिवाय अर्जुन माथूर एका वकिलाची भूमिका साकारणार आहे.
‘न्याय’ या वेब सीरिजचं दिग्दर्शन नित्या मेहरा आणि करण कपाडिया यांनी केलं आहे. नित्याने याआधी ‘बार बार देखो’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ‘सैय्यारा’ या चित्रपटानंतर अनितचे चाहते आता तिला ओटीटीवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
18 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी या चित्रपटाने 26.5 कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरातील कमाईचा आकडा 300 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.