
मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman khan) हा दबंग स्टार म्हणून ओळखला जातो. त्याचे चाहते त्याच्या धमाकेदार चित्रपटाच्या प्रतीक्षेत असतात. नेहमीप्रमाणेच चाहते टायगर 3 (Tiger 3 movie) चित्रपटासाठी एक्सायडेट आहेत. टायगर 3 द्वारे सलमान हा बॉक्स ऑफीसचे अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. बऱ्याच काळापासून त्याचा एकही धमाकेदार पिक्चर रिलीज झालेला नाही. त्यामुळेच सर्वांचे लक्ष टायगर 3 कडे लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सलमानने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
सलमान खानने इन्स्टाग्राम , या त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टायगर 3 चे ऑफिशिअल पोस्टर शेअर करत रिलीज डेटचा खुलासा केला आहे. या पोस्टनुसार टायगर 3 हा चित्रपट दिवाळीच्या काळात थिएटरमध्ये दाखल होणार आहे. म्हणजेच ही दिवाळी भाईजानची असणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरबद्दल बोलायचे झाले तर, त्यावर सलमान खान आणि कतरिना कैफ हे दोघेही शानदार अंदाजात दिसत आहेत.
सलमानने शेअर केले पोस्टर
हे पोस्टर शेअर करताना सलमान खानने खास कॅप्शनही लिहीली आहे. ‘ (मी) येत आहे !’ Tiger3 on Diwali, असे त्याने नमूद करत कतरिना कैफलाही टॅग केले आहे. हा बहुचर्चित चित्रपटट हिंदी, तामिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही सलमानने लिहीले आहे. कतरिना कैफचा दमदार अंदाजही यात पहायला मिळणार आहे. एवढेच नव्हे तर चित्रपटाच्या या तिसऱ्या भागात अभिनेता इमरान हाश्मी खलनायक बनून सर्वांनाच धक्का देताना दिसणार आहे.
पठाणशी आहे खास कनेक्शन
अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये सलमान खानने कॅमिओ केला होता. या चित्रपटात सलमानची एन्ट्री टायगरच्या भूमिकेत झाली होती. ज्याचा थेट संबंध टायगर 3 शी जोडण्यात आला होता. त्यानंतर सलमानच्या या चित्रपटात शाहरूखही कॅमिओ करणार असून तो पठाणच्या भूमिकेत दिसणार आहे, अशी चर्चा सुरू आहे.