पैसे दिले नाही तर..; सलमानच्या कुटुंबाशी पंगा, धमकीमुळे भीतीचं वातावरण

अभिनेता सलमान खानच्या एका अत्यंत जवळच्या व्यक्तीला धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस पुढील तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वीत रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर गोळीबार झाला आणि त्यानंतर रणवीर सिंहलाही धमकी देण्यात आली होती.

पैसे दिले नाही तर..; सलमानच्या कुटुंबाशी पंगा, धमकीमुळे भीतीचं वातावरण
Rajpal Yadav
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 11, 2026 | 11:46 AM

काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असतानाच अभिनेता रणवीर सिंहला व्हॉट्सअॅपवर धमकी मिळाली. रणवीरच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली, तेव्हा अभिनेता सलमान खानच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकासोबतही अशीच घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान हा आधीपासून लॉरेन्स बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे. आता त्याच्या जवळच्या नातेवाईकाला धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला असून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. धमकी देणाऱ्याने स्वत:ला लॉरेन्स बिष्णोई गँगचा असल्याचं म्हटलं आहे. पैसे दिले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी या ई-मेलमधून देण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून अद्याप सलमान किंवा त्याच्या जवळच्या सहकाऱ्याने याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केली नाही. अशा हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये लोक अनेकदा तक्रार दाखल करण्यास कचरतात आणि पोलिसांनी स्वत:हून चौकशी सुरू करावी, असं त्यांना वाटत असल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. तरीही धमकीची माहिती समोर आल्यापासून पोलीस हाय अलर्टवर आहेत आणि या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

औपचारिक तक्रार दाखल न झाल्याने पोलिसांच्या कारवाईलाही मर्यादा येतात. तरीही मुंबई गुन्हे शाखा याप्रकरणी पुढील तपास करत आहे. पोलिसांसमोर असलेलं आणखी एक मोठं आव्हान म्हणजे, अशा धमकीचा ई-मेल करताना गुन्हेगार अनेकदा VPN आणि इतर तांत्रिक माध्यमांचा वापर करून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांत झालेल्या घटनांमुळे हे स्पष्ट होतंय की बिष्णोई गँग हे प्रमुख बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करत आहे. बॉलिवूडमध्ये अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने इंडस्ट्रीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर अभिनेता रणवीर सिंहलाही धमकीचा मेसेज मिळाला होता. ही धमकी त्याला व्हॉट्सअॅप व्हॉइस नोटद्वारे देण्यात आली होती. रणवीरकडे कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या धमकीबद्दलची माहिती त्याने मुंबई पोलिसांना दिली असून त्यानंतर त्याच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.