तिने बेल वाजवली अन्..; घरात घुसलेल्या त्या महिलेबद्दल सलमान खानचा खुलासा

अभिनेता सलमान खानने कपिल शर्माच्या शोमध्ये हा किस्सा सांगितला. एक चाहतीने त्याच्या अपार्टमेंटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षारक्षकांना चकवा देऊन ती सलमानच्या घरापर्यंत पोहोचली होती. तिने घराची बेलसुद्धा वाजवली होती.

तिने बेल वाजवली अन्..; घरात घुसलेल्या त्या महिलेबद्दल सलमान खानचा खुलासा
सलमान खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 22, 2025 | 3:49 PM

कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सिझनची 21 जूनपासून सुरुवात झाली आहे. नव्या सिझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेता सलमान खानने हजेरी लावली. या एपिसोडमध्ये सलमान आणि कपिल शर्माने बरीच धमाल केली. या दोघांच्या थट्टामस्करीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी सलमानने त्याच्या घरात घडलेला एक किस्सासुद्धा सांगितला. काही दिवसांपूर्वी सलमानच्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मध्ये एक महिला शिरली होती. सुरक्षारक्षकांना चकवा देत ती सलमानच्या घरात घुसली होती. तेव्हाचा हा किस्सा सलमानने कपिलच्या शोमध्ये उलगडून सांगितला.

या एपिसोडदरम्यान कपिल शर्माने सलमान खानला विचारलं की, कधी एखादा चाहता किंवा चाहती तिचं सामान घेऊन तुझ्या घरी पोहोचली का? त्यावर उत्तर देताना सलमानने ही घटना सांगितली. तो म्हणाला, “होय, नुकतंच असं घडलं होतं. बाहेर सुरक्षारक्षक उभे होते. एका महिलेनं त्यांना सांगितलं की तिला चौथ्या मजल्यावर जायचं आहे आणि ती थेट आत शिरली. तिने घराची बेल वाजवली तेव्हा मोलकरीणीने दरवाजा उघडला होता. तिला पाहून मोलकरीणसुद्धा चकीत झाली होती. मला सलमानने बोलावलं आहे, असं त्या महिलेनं मोलकरीणीला सांगितलं होतं. परंतु तिला पाहून लगेच समजलं होतं की मी तिला बोलावलं नसेन. ती एक चाहती होती. नंतर तिला तिथून जाण्यास सांगितलं गेलं. असं याआधीही अनेकदा झालं आहे. माझ्या घराचे दरवाजे लोकांसाठी नेहमीच खुले असतात.”

ही घटना याच वर्षी घडली होती. एका महिलेनं सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. सिक्युरिटी गार्डला चकवा देऊन ती आत गेली होती. नंतर तिला ताब्यात घेण्यात आलं होतं. 20 मे रोजी ही घटना घडली होती. त्यापूर्वी आणखी एका व्यक्तीने सलमानच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला होता. छत्तीसगडमधून आलेल्या या व्यक्तीने लपूनछपून इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी नंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

काही महिन्यांपूर्वीच सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली. त्याच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ काचसुद्धा लावण्यात आली आहे. त्याचसोबत इमारतीच्या परिसरात हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केला होता. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.