
सौदी अरबच्या रियाध इथं आयोजित केलेल्या ‘जॉय फोरम 2025’मध्ये अभिनेता सलमान खान उपस्थित होता. या कार्यक्रमात त्याने केलेल्या एका वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. भारतीय चित्रपटांच्या जागतिक लोकप्रियतेबद्दल आणि मिडल ईस्टमध्ये काम करणाऱ्या वाढत्या दक्षिण आशियाई समुदायांबद्दल बोलताना त्याने बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला. त्यावरून नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमात सलमानसोबतच शाहरुख खान आणि आमिर खानसुद्धा उपस्थित होते.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सलमान म्हणतोय, “सध्याच्या घडीला, तुम्ही जर हिंदी चित्रपट बनवला आणि तो इथे (सौदी अरेबियामध्ये) प्रदर्शित केला, तर तो सुपरहिट होईल. जर तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळम भाषेत चित्रपट बनवला, तर तो शेकडो कोटींची कमाई करेल. कारण इतर देशांमधून विविध भाषिक लोक इथे मोठ्या प्रमाणात आले आहेत. बलुचिस्ततानमधील लोक आहेत, अफगाणिस्तानातील आहेत, पाकिस्तानातील लोकं आहेत. प्रत्येकजण इथे कामासाठी येतोय.” सलमानच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
Finally @BeingSalmanKhan acknowledged Balochistan is not Part of Pakistan ✌️❤️🙏
Salam Khan said “ People of Balochistan, Afghanistan , Pakistan & everywhere”@BDUTT #Balochistan #Baloch pic.twitter.com/TgdqrZhzr6
— Bilal Baloch (@bbfr74) October 18, 2025
‘सलमानने बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान असा उल्लेख केला आहे, यावरून बरंच काही कळतंय’, असं एकाने म्हटलंय. तर ‘बलुचिस्तान हा पाकिस्तानी प्रांत नाही, तो एक वेगळा राष्ट्र आहे’, असं बलुचिस्तान समर्थकांनी म्हटलंय. ‘सलमानने कबूल केलंय की बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नाही’, असंही एका युजरने लिहिलं आहे. ‘सलमानने जाणूनबुजून असं म्हटलंय की त्याच्या तोंडून ते चुकून किंवा अनवधानाने म्हटलं गेलं’, असाही सवाल नेटकरी करत आहेत.
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वांत मोठा प्रांत आहे. पाकिस्तानच्या गॅस उत्पादनातही त्याचा 40 टक्के वाटा आहे. या प्रांताचं धोरणात्मक महत्त्व असूनही पाकिस्तानच्या केंद्रीय नेतृत्वाने या प्रदेशाकडे सतत दुर्लक्ष केलं. यामुळे 1948 मध्ये पाकिस्तानमध्ये सामील झाल्यापासून त्यांची स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली. बलुच प्रदेश आणि परिसर हा तीन भागात विभागलेला आहे. उत्तरेकडील प्रदेश सध्याच्या अफगाणिस्तानचा भाग आहे, पश्चिमेकडील प्रदेशाला सिस्तान-बलुचिस्तान म्हणतात, तो इराणमध्ये आहे आणि उर्वरित भाग पाकिस्तानमध्ये आहे.