Salman Khan : 4000 कोटींचं बजेट, व्हीएफएक्स, हे सर्व खरं नाही…’रामायण’ सिनेमाबद्दल सलमान खानचं वक्तव्य चर्चेत
Salman Khan On Ramayana : सलमान खाननं नुकतंच 'रामायण' या सिनेमाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. काय म्हणाला अभिनेता? जाणून घ्या.

रणबीर कपूरचा ‘रामायण’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या पौराणिक चित्रपटाचे प्रेक्षक, समीक्षक आणि चित्रपट कलाकारांनी कौतुक केलं आहे. आता सलमान खाननं या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘रामायण’ सिनेमा त्याच्या स्टारकास्ट, व्हीएफएक्स आणि 4000 कोटी रुपयांच्या बजेटमुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही लोक व्हीएफएक्सचे कौतुक करत आहेत. मात्र, ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या व्हीएफएक्सवर जोरदार टीका झाली होती. आता सलमानचं म्हणणं आहे की, सिनेमाचं बजेट आणि व्हीएफएक्सवर जास्त चर्चा व्हायला नको.
सलमान ‘रामायण’बद्दल काय म्हणाला?
सलमान खाननं नुकतीच त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. माध्यमांशी संवाद साधताना अभिनेता ‘रामायण’ सिनेमाबद्दल बोलला. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये अभिनेता म्हणाला, 4000 कोटी रुपये, व्हीएफएक्स-व्हीएफएक्स… हे सर्व खरं नाही असं मला वाटतं. रामायणाबद्दलची चर्चा केवळ रामायणावरच केंद्रित असायला हवी. राम, रावण, सीता आणि इतर पात्रांवर. जर तुम्हाला रामायण चित्रपटाबद्दल बोलायचं असेल, तर त्याच्या खर्चाबद्दल आणि व्हीएफएक्सबद्दल नाही, तर प्रत्यक्ष रामायणाबद्दलच बोला. रामाबद्दल, त्याच्या गुणांबद्दल बोला. सलमान खान म्हणाला की, ‘मातृभूमी’मधील त्याचं पात्र अगदी रामासारखं आहे. तो सर्वोत्तम मुलगा, सर्वोत्तम पती आणि सर्वोत्तम वडील आहे.
सलमान खानचा आगामी चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
अनेक महिन्यांपासून रखडलेल्या सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट 4 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. अपूर्व लाखियाच्या या चित्रपटात तो पहिल्यांदाच चित्रांगदा सिंगसोबत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलरही काही दिवसांत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.