
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. समंथाने अभिनेता नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नाग चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. नाग चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर समंथाने त्याच्यासोबतच्या एकेक आठवणी पुसण्याचा प्रयत्न केला आहे. काही महिन्यांपूर्वी तिने लग्नातील व्हाइट गाऊनपासून नवीन काळ्या रंगाचा ड्रेस बनवला होता. असं करून समंथाने तिचा सूड घेतला, अशा प्रतिक्रिया त्यावेळी चाहत्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर आता समंथाने तिच्या साखरपुड्याच्या अंगठ्यापासून नवीन गोष्ट बनवल्याचं म्हटलं जातंय. ज्वेलरी इन्फ्लुएन्सर ध्रुमित मेरुलियाने समंथाच्या साखरपुड्याच्या अंगठीबाबत हा दावा केला आहे.
ध्रुमित मेरुलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने म्हटलंय की नाग चैतन्यने साखरपुड्यानिमित्त समंथाला तीन कॅरेट प्रिन्सेस कट डायमंड रिंग भेट म्हणून दिली होती. आता त्याच रिंगपासून समंथाने पेंडंट बनवल्याचा दावा ध्रुमितने केला आहे. समंथाच्या गळ्यातील चेनमध्ये अगदी तसंच पेंडंट पहायला मिळतंय. प्रिन्सेस कट डायमंडपासून तिचं हे पेंडंट बनवलं गेलंय. ध्रुमितच्या या व्हिडीओवर अद्याप समंथाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही किंवा साखरपुड्याच्या अंगठीपासून पेंडंट बनवल्याचं तिने सोशल मीडियावर सांगितलं नाही.
काही महिन्यांपूर्वी समंथाने तिच्या लग्नाच्या गाऊनला कात्री लावत त्यापासून नवीन ड्रेस बनवला होता. नाग चैतन्यसोबतच्या ख्रिश्चन लग्नात समंथाने जो गाऊन परिधान केला होता, त्याला तिने वेगळं रुप दिलं होतं. यामागील कारणसुद्धा समंथाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. “मी असं का केलं यामागचं कारण म्हणजे मला खरंच त्या गाऊनला एक वेगळं रुप द्यायचं होतं आणि सुरुवातीला मला त्रास नक्की झाला होता. मला वेदना जाणवत होत्या पण मी त्यापासून नवीन काहीतरी बनवण्याचा निर्णय घेतला. होय, मी विभक्त झाले आहे आणि माझा घटस्फोट झाला आहे. गोष्टी परीकथेसारख्या नाहीत पण याचा अर्थ असा नाही की एका कोपऱ्यात बसून त्याबद्दल रडत बसावं आणि आयुष्यात पुन्हा कधीच आनंदाने जगू नये”, असं समंथा म्हणाली होती.