
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने 1 डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केलं. नाग चैतन्यला घटस्फोट दिल्याच्या चार वर्षांनंतर समंथाने राजशी लग्नगाठ बांधली. इन्स्टाग्रामवर या लग्नाचे खास फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला. कोईंबतूर इथल्या ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी देवीसमोर या दोघांनी ‘भूत शुद्धी विवाहपद्धती’नुसार लग्न केलं. यावेळी फक्त 30 पाहुणे उपस्थित होते. समंथाने तिच्या लग्नासाठी प्राचीन पद्धतीचा स्वीकार केला. परंतु अनेकांना या विवाहपद्धतीबाबत फारशी माहिती नाही. भूत शुद्धी विवाहपद्धती म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल जाणून घेऊयात..
भूत शुद्धी विवाह हा एक प्राचीन योगिक विधी आहे. या विधीदरम्यान विवाहाच्या पवित्र बंधनापूर्वी जोडप्याच्या शरीरातील पाच घटकांना – पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांना शुद्ध करतो. या विधीद्वारे जोडप्यामध्ये गहिरं आणि दिव्य संबंध स्थापिक केला जातो. त्यांना मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिकरित्या शुद्ध केलं जातं. भूत शुद्धी विवाह हा ईशा फाऊंडेशनने केलेला एक विवाह विधी आहे.
भूत शुद्धी विवाह हा सदगुरू म्हणजेच अध्यात्मिक गुरू जग्गी वासूदेव यांच्या ईशा फाऊंडेशनने सादर केलेला योगिक पद्धतीवर आधारित विवाह विधी आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भूत शुद्धी म्हणजे मानवी शरीराच्या पाच घटकांचे (पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश) शुद्धीकरण. भूत शुद्धी विवाहामुळे जोडप्याला मूलभूत पातळीवर मजबूत बंधन निर्माण करण्याची संधी प्रदान करतो. या पवित्र समारंभात, जोडपं अग्निभोवती फेरे घेतात.
पाच तत्त्वांचं शुद्धीकरण: या विवाह प्रक्रियेत शरीरातील पाच तत्वे- पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश शुद्ध होतात.
सखोल बंध: ही प्राचीन प्रक्रिया जोडप्यांना मूलभूत पातळीवर एकमेकांशी खोलवर जोडण्यात मदत करते.
योगिक परंपरा: ही सदगुरूंनी रचलेली योगिक पद्धतीवर आधारित एक विधी आहे.
लिंग भैरवी देवीचा आशीर्वाद: हे लग्न लिंग भैरवी देवीच्या आशीर्वादाने संपन्न होतं.
अध्यात्मिक फायदे: ही प्रक्रिया जोडप्याला मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिकरित्या शुद्ध करते, ज्यामुळे त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदी आणि समृद्ध होतं.
विधी: या विधीमध्ये मंत्रांचा जप, पवित्र अग्नीची प्रदक्षिणा आणि इतर विशेष मूलभूत मंत्रांसह विधींचा समावेश असतो.
अध्यात्मिक गुरू सदगुरूंनी लिंग भैरवीची स्थापना केली. लिंग भैरवी हे एक शक्तिशाली देवीचं स्वरुप आहे. ही देवी स्त्री ऊर्जेचं प्रचंड आणि करुणामयी रुप मानली जाते. त्यांना सृष्टी आणि रहस्येचं द्वार मानलं जातं, जी भक्तांना भौतिक आणि अध्यात्मिक अशा दोन्ही पद्धतीने आयुष्यचं महत्त्व समजण्यास मदत करते.
भूत शुद्धी विवाहपद्धतीनुसार लग्न झाल्यानंतर जोडपं त्यांच्या इच्छेनुसार पुन्हा आपापल्या परंपरेनुसारही लग्न करू शकतात. या विवाहपद्धतीत प्रत्येक तत्वासाठी म्हणजेच पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश यांच्यासाठी पाच फेरे असतात. पाच फेऱ्यांनंतर लिंग भैरवी देवीचं पेंडंट आणि हळकुंडाचं मंगळसूत्र घातलं जातं. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तात्विक मंत्रोच्चारण केले जातात.
(Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. TV9 मराठी त्याची पुष्टी करत नाही.)