
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने डिसेंबर 2025 मध्ये दिग्दर्शक राज निदिमोरुशी दुसरं लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली. 2021 मध्ये नाग चैतन्यसोबत तिचा घटस्फोट झाला होता. लग्नाच्या चार वर्षांतच हे दोघं विभक्त झाले होते. त्याचदरम्यान समंथाला मायोसिटीस या ऑटो-इम्युन आजाराचं निदान झालं होतं. त्यामुळे ती खूपच खचली होती. आयुष्यातील त्या कठीण काळाबद्दल समंथा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. या काळात राजने तिची कशी साथ दिली, याबद्दलही तिने सांगितलं आहे. समंथा आणि राज यांनी कोईंबतूर इथल्या ईशा योग सेंटरमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं.
‘वोग’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत समंथा म्हणाली, “जेव्हा माझा घटस्फोट झाला, तेव्हा मी स्वत:ला पूर्णपणे एका कोषात बंद करून घेतलं होतं. मी पुन्हा कधी कोणावर विश्वास ठेवू शकेन की नाही, असं मला वाटलं होतं. परंतु देवाचे मी आभार मानते की आयुष्यात मी पुन्हा हिंमत मिळवली आणि त्याच पद्धतीने प्रेमाचा, मैत्रीचा स्वीकार केला. आज मी आधीपेक्षा उत्तम व्यक्ती बनले आहे. राजसारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात असल्याने हे शक्य झालं आहे. माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींनाही माझ्यातील हा सकारात्मक बदल दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच मी माझ्या एका जुन्या मैत्रिणीला भेटले. या भेटीनंतर तिने मला व्हॉइस नोट पाठवला की, बऱ्याच वेळानंतर मला असं जाणवलं की तू आता गुदमरून जगत नाहीये, आता तू ठीक असल्याचा दिखावा करत नाहीयेस.”
यावेळी पती राज निदिमोरूबद्दल समंथा पुढे म्हणाली, “राज आणि मी तसे वैताग आणणारे कपल आहोत, जे प्रत्येक काम सोबत करतात. आम्ही एकत्र काम करतो, एकत्र फिरतो, ट्रेनर परीधीसोबत एकत्र वर्कआऊट करतो. आम्हाला दोघांना असं सगळं करायला खूप आवडतं. आता जर एका दिवसासाठीही मला कुठे बाहेर जावं लागलं, तर मी चिंतेत येते. मला वाटत नाही की हा हनिमूनचा टप्पा आहे, कारण त्यासाठी आम्ही बराच वेळ एकमेकांसोबत घालवला आहे.”
1 डिसेंबर रोजी कोइंबतूरमधल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात समंथा आणि राज यांनी लग्न केलं. या लग्नाला फक्त 30 पाहुणे उपस्थित होते. या दोघांच्या वयात सात ते आठ वर्षांचं अंतर आहे. राज निदिमोरूचंही हे दुसरं लग्न आहे. त्याने सहाय्यक दिग्दर्शिका श्यामली डे हिच्याशी पहिलं लग्न केलं होतं. राज निदिमोरू आणि श्यामली डे यांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतला. राज दिग्दर्शक, लेखक आणि निर्मातासुद्धा आहे. कृष्णा डीकेसोबतची त्याची जोडी लोकप्रिय आहे. या दोघांनी मिळून ‘द फॅमिली मॅन’ या गाजलेल्या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलंय.