समंथा – नाग चैतन्य एकाच छताखाली; लग्नसोहळ्यात जोडीदारासोबत आमनेसामने?
समंथा आणि नाग चैतन्य यांना हैदराबादमधील एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पाहिलं गेलं. निर्माते सुनील नारंग यांच्या मुलीच्या लग्नाचं हे रिसेप्शन होतं. यावेळी राज निदिमोरू आणि सोभिता धुलिपालासुद्धा उपस्थित होते.

‘एशियाज सिनेमाज’चे निर्माते, वितरक सुनील नारंग यांची मुलगी सिमरन नारंग हिचं शनिवारी हैदराबादमध्ये धूमधडाक्यात लग्न झालं. या लग्नसोहळ्याला चिरंजीवी, नागार्जुन यांच्यासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या सर्वांत दोन जोडप्यांनी सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. एकीकडे अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिचा पती आणि निर्माता-दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत या लग्नाला पोहोचली होती. तर दुसरीकडे समंथाचा पूर्व पती आणि अभिनेता नाग चैतन्य हा त्याची पत्नी सोभिता धुलिपालासोबत तिथे हजर होता. नाग चैतन्य आणि समंथा हे घटस्फोटानंतर अनेकदा हैदराबादमधील चित्रपटांशी संबंधित किंवा इतर कार्यक्रमांना उपस्थित राहिले. परंतु या दोघांना एकत्र पाहणं तसं दुर्मिळच आहे.
सोशल मीडियावर सध्या या दोन जोडप्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एकीकडे समंथा आणि राज हे पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना दिसले. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये नाग चैतन्य, सोभिता हे नागार्जुन आणि अमला यांच्यासोबत रिसेप्शनला उपस्थित असल्याचं दिसून आलं. या रिसेप्शनमध्ये नाग चैतन्य आणि समंथा हे एकमेकांसमोर आले होते की नाही, याबद्दलची कोणतीच माहिती किंवा फोटो-व्हिडीओ समोर आले नाहीत.
समंथा आणि नाग चैतन्य यांनी जवळपास चार वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये धूमधडाक्यात लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर लगेचच नाग चैतन्य आणि सोभिता यांच्या अफेअरच्या चर्चा समोर आल्या होत्या. 2024 मध्ये साखरपुडा आणि लग्न करत या दोघांना चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर 2023 च्या अखेरीस समंथा आणि राज निदिमोरू एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा पसरल्या होत्या. नंतर समंथाने राजसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात सुरुवात केली. अखेर डिसेंबर 2025 मध्ये या दोघांनीही कोईंबतूरमधल्या ईशा योग सेंटरमध्ये लग्न केलं.
घटस्फोटानंतर समंथा आणि नाग चैतन्य जरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे निघून गेले असले तरी त्यांची चर्चा सतत सोशल मीडियावर होतच असते. त्यामुळे या दोघांनी एकाच छताखाली येणं, ही चर्चेची बाब ठरणं, यात काही शंका नाही. शिवाय या दोघांच्या पार्टनर्सचीही तुलना सतत सोशल मीडियावर होत असल्याने ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.