समंथाच्या लग्नाच्या 3 दिवसांनंतर नाग चैतन्यच्या पत्नीने लिहिली अशी पोस्ट; व्हिडीओही चर्चेत
दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकतंच दुसरं लग्न केलं. दिग्दर्शक राज निदिमोरूशी तिने लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता नाग चैतन्यची दुसरी पत्नी सोभिता धुलिपालाची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

नाग चैतन्यला घटस्फोट दिल्याच्या चार वर्षांनंतर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं. 1 डिसेंबर रोजी कोईंबतूर इथल्या ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात त्यांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. या लग्नाच्या तीन दिवसांनंतर म्हणजेच 4 डिसेंबर रोजी नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. सोभिता आणि नाग चैतन्यने गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी लग्न केलं होतं. आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सोभिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक रील पोस्ट केली आहे. यामध्ये तिच्या विवाहसोहळ्याची झलक पहायला मिळतेय. या व्हिडीओमध्ये सोभिता आणि नाग चैतन्य एकमेकांविषयी आपल्या भावना मोकळपणे व्यक्त करताना दिसत आहेत. समंथाच्या लग्नाच्या तीन दिवसांनी सोभिताने हा व्हिडीओ शेअर केल्याने त्याची चर्चा होऊ लागली आहे.
या व्हिडीओमध्ये सोभिता म्हणते, “एखादी व्यक्ती अपूर्ण असते, दुसरी व्यक्ती जेव्हा आयुष्यात येते तेव्हा ती पोकळी भरून निघते, यावर माझा विश्वास आहे असं मला वाटत नाही. कारण आम्ही दोघं आपापल्या आयुष्यात पूर्णच आहोत. तरीसुद्धा त्याच्या अनुपस्थितीत मी पूर्ण नसेन.” यानंतर नाग चैतन्यसुद्धा सोभिताबद्दलच्या त्याच्या भावना व्यक्त करतो. “तिच्याबद्दलचा विचार आणि जेव्हा मी झोपेतून उठतो किंवा झोपायला जातो तेव्हा ती माझ्या आयुष्यात असल्याचा केवळ विचारसुद्धा माझं मन हलकं करतं. ही अत्यंत सहजतेची भावना आहे. ती माझ्या बाजूला असली की मी काहीही जिंकू शकतो, असं मला वाटतं”, असं तो म्हणाला.
View this post on Instagram
सोभिताने पोस्ट केलेल्या या व्हिडीओच्या ‘टायमिंग’मुळे त्याची विशेष चर्चा होत आहे. नाग चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांनी जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये लग्न केलं. परंतु लग्नाच्या चार वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. 2021 मध्ये समंथा आणि नाग चैतन्य विभक्त झाले. त्यानंतर नाग चैतन्यने 2024 मध्ये सोभिताशी दुसरं लग्न केलं आणि आयुष्याची नवी सुरुवात केली. आता समंथासुद्धा तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे. राज निदिमोरू आणि समंथा या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
