समंथाने संसार मोडला? राज निदिमोरुच्या पूर्व पत्नीने सोडलं मौन; म्हणाली ‘रात्रभर झोप नाही, तळमळत..’
समंथा आणि राज निदिमोरू यांच्या लग्नाबद्दल अखेर त्याच्या पूर्व पत्नीने मौन सोडलं आहे. श्यामली डे हिनं इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित यावर प्रतिक्रिया दिली आहे. श्यामली आणि राज यांचा 2022 मध्ये घटस्फोट झाला होता.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने दिग्दर्शक राज निदिमोरूशी 1 डिसेंबर 2025 रोजी लग्न केलं. या लग्नानंतर सोशल मीडियावर राजची पूर्व पत्नी श्यामली डे हिच्यासंदर्भात बरीच चर्चा होऊ लागली आहे. राज आणि श्यामली यांचा घटस्फोट झाला नाही, असं काहींनी म्हटलं. तर काही युजर्सनी श्यामलीला पाठिंबा देत समंथाला ट्रोल केलं. समंथा घर फोडणारी आहे, तिने राज आणि श्यामलीचा संसार मोडला, अशी टीका नेटकऱ्यांनी केली. अशातच आता श्यामलीने या चर्चांवर मौन सोडलं आहे. इन्स्टा स्टोरीवर पोस्ट लिहित तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकजण श्यामलीबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत.
श्यामलीने तिच्या शुभचिंतकांचे आभार मानले आहेत. तिने लिहिलं, ‘मी रात्रभर झोपले नाही. या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होते. माझ्या डोक्यात बरेच विचार सुरू होते. माझ्यासोबत जे काही होतंय, त्याबद्दल काही बोलले नाही तर मी कृतघ्न ठरेन. माझ्या दिशेने ज्या गोष्टी येत आहेत, त्यांचा स्वीकार न करणं उचित ठरणार नाही. मी गेल्या अनेक वर्षांपासून मेडिटेशन करतेय. मेडिटेशनचा अर्थ असा आहे की पृथ्वी, सर्व लोक आणि जीवांच्या शांतीसाठी, प्रेमासाठी, माफीसाठी आणि चांगल्या कर्मांसाठी आशीर्वाद देणं. एका मैत्रिणीने मला याची आठवण करून दिली की आता जे काही मला मिळतंय, ते याच ऊर्जेचा परतावा आहे.’
‘माझी कोणतीच टीम नाही, कोणतंच पीआर नाही, स्टाफ नाही, सहकारी नाही.. जे माझं पेज मॅनेज करू शकतील. मी वैयक्तिकरित्या मेसेजेसना प्रतिक्रिया देत आहे. अशातच मी एका अशा गोष्टीचा सामना करतेय, जिथे माझ्या संपूर्ण उपस्थितीची गरज आहे. 9 नोव्हेंबर रोजी माझ्या ज्योतिष गुरूजींना चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं. कॅन्सर त्यांच्या मेंदूपासून शरीराच्या अनेक भागांमध्ये पसरला आहे. मला खात्री आहे की या कठीण काळात तुम्ही सर्वजण माझं लक्ष सध्या कुठे केंद्रीत केलं पाहिजे हे समजून घ्याल. म्हणूनच माझी नम्र विनंती आहे की कृपया ही जागा (सोशल मीडिया) स्वच्छ ठेवा. मला आशा आहे की प्रत्येक सजीवाला चांगलं आरोग्य, समृद्धी आणि अध्यात्म मिळेल’, असं तिने म्हटलंय.
आणखी एका पोस्टमध्ये श्यामलीने लिहिलं, ‘जर कोणी इथे ड्रामा आणि ब्रेकिंग न्यूज शोधत असेल तर तुम्हाला ते मिळणार नाही. मी तुम्हाला विनंती करते की मला सोडा. मला कोणत्याच प्रकारचं लक्ष, मीडिया कव्हरेज, विशेष मुलाखती, ब्रँड प्रमोशन, पेड पार्टनरशिप किंवा सहानुभूती नको आहे. मी इथे कोणालाही काहीही सांगू इच्छित नाही.’ श्यामलीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
