दोनदा गर्भपात, नको होतं बाळ.. चर्चांवर समंथाने दिलं सडेतोड उत्तर; प्रेग्नंसीबद्दल म्हणाली..
नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. तिच्यावर गर्भपाताचेही आरोप झाले होते. या चर्चांवर आता समंथाने अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. प्रेग्नंसीविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लवकरच आई होणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये तिने दिग्दर्शक-निर्माता राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं होतं. हे दोघं आता आई-बाबाची भूमिका स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. समंथाने याआधी दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला होता. या घटस्फोटामागचं मुख्य कारण समंथाला आई व्हायचं नव्हतं, असं म्हटलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर तिने दोन वेळा गर्भपात केल्याचाही आरोप तिच्यावर झाला होता. या सर्व आरोपांवर आता समंथाने अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. “या क्षणाची मी खूप प्रतीक्षा करत होते आणि आता आयुष्याला एक नवीन उद्देश आणि ताकद मिळाली आहे”, असं ती म्हणाली.
समंथा आणि नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या वेळी एका निवृत्त डॉक्टरने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करत बरेच धक्कादायक दावे केले होते. समंथाने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आई होण्यास नकार दिला, तिने दोन वेळा गर्भपात केला आणि फिगर खराब होऊ नये यासाठी सरोगसीचाही पर्याय सुचवल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला होता. या व्हिडीओमुळे त्यावेळी विविध चर्चांना उधाण आलं होतं आणि समंथाला प्रचंड ट्रोलसुद्धा करण्यात आलं होतं.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथा तिच्या प्रेग्नसीविषयी म्हणाली, “अर्थातच हा अनुभव नवीन आणि रोमांचक आहे. पण मी बऱ्याच काळापासून या क्षणाची प्रतीक्षा करत होते. मला नेहमीच आई व्हायचं होतं. त्यामुळे मला माहीत आहे की मी यासाठी माझं सर्वस्व देईन. गरोदरपणामुळे मला एक वेगळीच शक्ती मिळाली आहे. मला आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत नेहमीच खूप रस होता. पण आता मला एक नवीन प्रकारची शक्ती आणि उद्देश मिळाल्यासारखं वाटतंय. मी या प्रवासासाठी खूप उत्सक आहे. माझं मन कृतज्ञतेनं भरलेलं आहे. मी दररोज काहीतरी नवीन शिकतेय आणि आयुष्यात पुढे जे काही येईल त्याचं स्वागत करण्याची तयारी करतेय.”
समंथाला आई व्हायचं नव्हतं, या चर्चांना याआधी ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या निर्मात्या नीलिमा गुमा यांनी फेटाळलं होतं. ‘हैदराबाद टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, “जेव्हा माझ्या वडिलांनी तिला चित्रपटासाठी विचारलं, तेव्हा तिला त्याची कथा खूप आवडली होती. ती हा चित्रपट करण्यासाठी खूप उत्सुक होती. पण तिने आम्हाला सांगितलं होतं की, शूटिंग जुलै किंवा ऑगस्टपर्यंत संपलं पाहिजे. कारण त्यावेळी ती नाग चैतन्यसोबत फॅमिली प्लॅनिंग करत होती. तिला आई व्हायचं होतं आणि त्यालाच तिचं प्राधान्य होतं. म्हणूनच ती आमच्या चित्रपटाला होकार देण्यापूर्वी फार विचार करत होती.”