अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर, समर्थ पॅनलची सरशी
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील निवडणुकीच्या मतमोजणी पूर्ण झाली असून या निवडणुकीत पुन्हा एकदा मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने बाजी मारली आहे. या पॅनलमधील सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. ही निवडणूक 17 जागेसाठी लढण्यात आली होती. ज्यामध्ये बिनविरोध 3 जागा झाल्या होत्या. त्यामुळे 14 जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती.
समर्थ पॅनेलमध्ये कोण?
मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या समर्थ पॅनेलमध्ये 16 उमेदवार होते. ज्यामध्ये सुनील महाजन, दीपक कदम, अजित शिरोळे, राज काजी, सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, गणेश गारगोटे आणि विकास तोरणे यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. हे सर्व 14 उमेदवार समर्थ पॅनेलमधून विजयी झाले आहेत.
तीन पदांवर बिनविरोध निवड
या निवडणुकीत काही पदांसाठी उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची अभिनेत्री प्रतिनिधी म्हणून, विजय खोचीकर यांची संकलन विभागातून आणि आनंद शिंदे यांची संगीत व पार्श्वगायन विभागातून बिनविरोध निवड झाली.
तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेक वाद समोर आले. अभिनेते विजय पाटकर यांनी काही व्यक्तींनी राजकारण करून आपला उमेदवारी अर्ज भरू दिला नसल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले.
दुसरीकडे, नीलम शिर्के यांच्या उमेदवारीवरूनही चर्चा रंगली होती. मात्र, अभिनेत्री वर्षा उसगावकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर नीलम शिर्के यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्रक प्रसिद्ध केले. त्यामुळे या विषयावरील वादाला काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला.
मतमोजणी केंद्रावर लिंबू -अगरबत्ती
सोमवारी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी कोल्हापूर येथील मतमोजणी केंद्राबाहेरील एका खुर्चीवर लिंबू, अंगारा आणि अगरबत्ती ठेवलेली आढळून आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काहींनी याला अंधश्रद्धेशी जोडले तर काहींनी हा केवळ योगायोग असू शकतो अशी प्रतिक्रिया दिली.
घटनेची माहिती समोर आल्यानंतर उपस्थितांमध्ये विविध चर्चांना उधाण आले. निवडणुकीदरम्यान आधीच वाद आणि आरोपांचे वातावरण असताना मतमोजणीच्या दिवशी समोर आलेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा महामंडळाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते.