पत्नी अन् बहिणीची ट्रोलिंग..; आर्यन खानच्या सीरिजविरोधात समीर वानखेडे, कोर्टात काय घडलं?

आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजविरोधात समीर वानखेडेंनी कोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी सुनावणी पार पडली असून आर्यनमुळे नेटफ्लिक्सला फटका बसला आहे. कोर्टात नेमकं काय घडलं, ते सविस्तर जाणून घ्या..

पत्नी अन् बहिणीची ट्रोलिंग..; आर्यन खानच्या सीरिजविरोधात समीर वानखेडे, कोर्टात काय घडलं?
Kranti Redkar and Sameer Wankhede and Aaryan Khan
Image Credit source: Instagram
Updated on: Oct 08, 2025 | 12:57 PM

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एकमेकांसमोर आले आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या आर्यनच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजमधील एका भूमिकेवर वानखेडेंनी आक्षेप घेतला आहे. याविरोधात त्यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यनच्या या सीरिजमध्ये वानखेडेंसारखी एक भूमिका दाखवण्यात आली आहे. ती भूमिका साकारणारा अभिनेतासुद्धा हुबेहूब समीर वानखेडेंसारखाच दिसतो. या चित्रणावरून मला आणि माझ्या कुटुंबीयांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याची तक्रार वानखेडेंनी कोर्टात केली. याप्रकरणी आज (बुधवार) सुनावणी झाली असून न्यायालयाने नेटफ्लिक्स, रेड चिलीज एंटरटेन्मेंट आणि इतरांविरुद्ध नोटीस बजावली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेन्मेंट आणि इतरांना सात दिवसांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

वानखेडेंनी दाखल केलेल्या याचिकेत शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खानच्या मालकीची रेड चिलीज एंटरटेन्मेंट कंपनी, नेटफ्लिक्स आणि इतरांचा उल्लेख आहे. याप्रकरणी कायमस्वरुपी आणि अनिवार्य आदेश देण्याची मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येकी दोन कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. ही रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दान करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

‘या वेब सीरिजमध्ये ड्रग्जविरोधात काम करणाऱ्या संस्थांचं दिशाभूल करणार आणि नकारात्मक चित्रण करण्यात आलं आहे. यामुळे अशा संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो. या सीरिजमुळे मला, माझ्या पत्नीला आणि बहिणीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. हे अत्यंत धक्कादायक आणि अपमानास्पद आहे’, असं वानखेडेंनी याचिकेत म्हटलंय. त्यांनी न्यायालयाला या सीरिजचं स्ट्रीमिंग आणि डिस्ट्रीब्युशन रोखण्याची, त्यातील कंटेंट बदनामीकारक असल्याचं घोषित करण्याची विनंतीदेखील केली आहे.

सीरिजमध्ये नेमकं काय दाखवलंय?

आर्यन खान दिग्दर्शित 8 भागांची ही सीरिज 18 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’च्या पहिल्या भागातच ड्रग्जविरोधात आवाज उठवणारा एक अधिकारी दाखवण्यात आला आहे, जो हुबेहूब समीर वानखेडेंसारखाच दिसतो. ‘वॉर अगेन्स्ट ड्रग्ज’ आणि ‘एनसीजी’चा भाग असल्याचा दावा करत तो बॉलिवूडच्या एका पार्टीत छापा टाकतो. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने ड्रग्जचा वापर होतो, याविषयी तो ओरडतो. या सर्व गोष्टींचा उल्लेख समीर वानखेडे आणि त्यांनी आर्यनविरोधात केलेल्या कारवाईशी संबंधित असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिल्या होत्या. यावरून बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले होते.