Sanjay Dutt: चूक माझीच होती.., घरात शस्त्रे ठेवल्याप्रकरणी संजय दत्तचा मोठा खुलासा; म्हणाला ‘मनाचं ऐकलं असतं तर..’

तुरुंगवास आणि कायदेशीर संघर्षानंतर संजय दत्तने पुन्हा चित्रपटसृष्टीत काम सुरू केलं. आजही तो विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, 1993 मधील त्या घटनेची आठवण सांगताना त्याने स्वतःच्या चुकीची जबाबदारी स्वीकारली आहे.

Sanjay Dutt: चूक माझीच होती.., घरात शस्त्रे ठेवल्याप्रकरणी संजय दत्तचा मोठा खुलासा; म्हणाला मनाचं ऐकलं असतं तर..
Sanjay Dutt
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 11, 2026 | 8:25 AM

Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. चित्रपटसृष्टीतील यश, वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि कायदेशीर अडचणी यांमुळे त्याचं आयुष्य कायम चर्चेत राहिलं. आता तब्बल अनेक वर्षांनंतर संजय दत्तने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित शस्त्रास्त्र प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘शेखर टुनाइट’ या शेखर सुमन यांच्या शोमध्ये बोलताना त्याने त्या काळातील निर्णयाची जबाबदारी स्वीकारली. ‘ती चूक माझीच होती’, असं म्हणत त्याने आजही त्या घटनेचा पश्चात्ताप होत असल्याचं सांगितलं.

‘मनाचं ऐकलं असतं, तर..’

1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर संजय दत्तच्या घरी बेकायदेशीर शस्त्रास्त्रं ठेवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणामुळे त्याच्या आयुष्याला मोठं वळण मिळालं. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत या घटनेची आठवण सांगताना संजयने त्या वेळी आपल्या मनातील इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचं मान्य केलं. त्या वेळी त्याच्या मनाला शस्त्रास्त्रं ठेवण्याचा निर्णय योग्य नसल्याचं जाणवत होतं. मात्र, दुसरीकडे त्याच्या डोक्यात हा विचार होता की, केवळ एका आठवड्यासाठी शस्त्रं ठेवली, तर त्यात काय नुकसान होणार आहे? याच विचारातून त्याने निर्णय घेतल्याची कबुली दिली. मात्र, या एका निर्णयाचे परिणाम इतके गंभीर असतील, याची मला कल्पना नव्हती, असंही तो म्हणाला.

Loading...

या घटनेवर बोलताना संजयने स्वतःची चूक मान्य केली. कोणताही निर्णय घेताना मनाचा आवाज ऐकणं महत्त्वाचं असतं, असं त्याने सांगितलं. तसंच आपण ज्या देशात राहतो, तिथल्या कायद्यांची माहिती प्रत्येकाला असायला हवी, असंही त्याने स्पष्ट केलं. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात भावनिक आठवण सांगताना संजय दत्तने वडील सुनील दत्त यांच्याबद्दलही भाष्य केलं. पोलिसांनी त्याला अटक करून बेड्या घातल्या, तेव्हा सुनील दत्त यांना मोठा धक्का बसला होता. आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. वडिलांना अशा परिस्थितीत पाहणं संजयसाठीही अत्यंत वेदनादायी होतं. मात्र, त्या क्षणी त्याने स्वतःच्या भावना बाजूला ठेवून वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेली कारवाई ही प्रक्रियेचा भाग असल्याचं सांगत त्याने वडिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

तुरुंगवासानंतर आयुष्याला नवं वळण

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासादरम्यान संजय दत्तकडे बेकायदेशीर शस्त्रं असल्याचं प्रकरण समोर आलं. या प्रकरणात त्याला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलं; मात्र बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी असल्याच्या दहशतवादविषयक आरोपांतून त्याची निर्दोष मुक्तता झाली. सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये त्याची शिक्षा पाच वर्षांपर्यंत कमी केली. त्यानंतर उर्वरित शिक्षा भोगून तो फेब्रुवारी 2016 मध्ये तुरुंगातून बाहेर आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us