Sanjay Dutt: 6 वर्षे येरवड्यात होतो, तरी मराठी शिकता आली नाही; प्रताप सरनाईकांसमोरच संजय दत्तचं वक्तव्य

संजय दत्तच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा चर्चा रंगली आहे. काहींनी त्याच्या विनोदी अंदाजाचं कौतुक केलं, तर काहींनी महाराष्ट्रात दीर्घकाळ वास्तव्यास असूनही स्थानिक भाषा न शिकल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले.

Sanjay Dutt: 6 वर्षे येरवड्यात होतो, तरी मराठी शिकता आली नाही; प्रताप सरनाईकांसमोरच संजय दत्तचं वक्तव्य
Sanjay Dutt and Pratap Sarnaik
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 07, 2026 | 1:53 PM

Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्त त्याच्या बेधडक आणि मिश्कील अंदाजासाठी ओळखला जातो. आता त्याचा असाच एक मजेशीर किस्सा चर्चेत आला आहे. मुंबईतील एका दहीहंडी कार्यक्रमात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत संजय दत्त मंचावर उपस्थित होता. यावेळी सरनाईक यांनी संजयला मराठीत बोलण्याची विनंती केली. मात्र, मराठीत बोलण्याऐवजी संजय दत्तने त्याच्या तुरुंगवासाचा संदर्भ देत अशी मिश्कील टिप्पणी केली की, उपस्थितांमध्ये हशा पिकला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये संजय दत्त आणि सरनाईक मंचावर उभे असल्याचे दिसत आहे. त्यांच्या मागे इतर मान्यवरही उपस्थित आहेत. यावेळी मंत्री सरनाईक म्हणतात, “आजकाल मी सगळ्यांना मराठी शिकवत आहे.” मुंबईतील ऑटोरिक्षा चालकांना शहरात काम सुरू ठेवण्यासाठी मराठीतील काही वाक्यांचं व्यवहार्य ज्ञान असणं आवश्यक असल्याचा त्यांच्या विभागाचा नुकताच निर्णय झाला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी हे वक्तव्य केले. या निर्णयावरून मुंबईत वादही निर्माण झाला आहे.

सरनाईक यांनी मराठीत पुढे सांगितलं, “म्हणून मला वाटलं, संजय दत्तची एण्ट्री झाल्यानंतर आपण त्याला मराठीत बोलायला लावूया. तो हिंदीत बोलतो, पण आपल्या सगळ्यांना मराठी समजते.” यानंतर संजय दत्तने माईक हातात घेत उत्तर दिलं, “प्रताप भाई, मी सहा वर्षे येरवडा जेलमध्ये होतो. तरीही मला मराठी शिकता आली नाही. थोडीफार शिकलो होतो.” पुढे संजय दत्तने सरनाईक यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना आपला जुना मित्र आणि भाऊ असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, “मला इथे बोलावल्याबद्दल मी प्रताप भाईंचा आभारी आहे. आमचं नातं खूप जुनं आहे. जवळपास 25 वर्षांपासून आमची ओळख आहे.”

संजय दत्तच्या मंचावरील या स्पष्ट वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली, त्यासाठी त्याचं कौतुक केलं. एका युजरने मिश्कील प्रतिक्रिया देताना म्हटलं, “संजय दत्त किंवा सलमान खानच असे आहेत, जे मंत्र्यांसमोर असं बोलूनही हसत परिस्थिती हाताळू शकतात.” तर आणखी एका युजरने लिहिलं, “त्याने अगदी स्टाइलमध्ये हा विषय टाळला.” मात्र, अनेकांनी या प्रसंगातील एक वेगळी बाजूही अधोरेखित केली. मुंबईतील ऑटोरिक्षा चालकांना मात्र अशाप्रकारे भाषेच्या नियमातून सहज सुटका मिळू शकत नाही, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. संजय दत्त मुंबईत इतकी वर्षे राहूनही मराठी न शिकल्याबद्दल काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us