Sanjay Dutt : इथे सिगारेट… संजय दत्तनं सांगितला तुरुंगातील थक्क करणारा अनुभव
Sanjay Dutt : संजय दत्तला २०१३ मध्ये, सर्वोच्च न्यायालयानं पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अशातच आता एका कार्यक्रमात संजय दत्तनं तुरुंगतील अनुभव सांगितला आहे.

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झाल्यानंतर संजय दत्तच्या आयुष्याला मोठं वळण लागलं. शस्त्र कायद्यांतर्गत बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आलं. २०१३ मध्ये, सर्वोच्च न्यायालयानं संजय दत्तला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण, चांगल्या वर्तणुकीबद्दल शिक्षेत सूट मिळाल्यानंतर, फेब्रुवारी २०१६ मध्ये त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटका झाली. अनेक वर्षांनंतर, संजय दत्तनं तुरुंगातील आपल्या काळाबद्दल उघडपणे सांगितलं आहे. शेखर सुमन यांच्या ‘शेखर टुनाईट’ या टॉक शोमध्ये बोलताना, संजय दत्तनं तुरुंगातील अनुभव सांगितला आहे. संजय दत्त म्हणाला की, श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबात वाढलेला असूनही, त्यानं स्वतःला कधीही इतरांपेक्षा श्रेष्ठ मानलं नाही.
काय म्हणाला संजय दत्त?
संजय दत्त म्हणाला, ‘तुम्हाला माहिती आहे, इतक्या वर्षांत…मला माझ्या स्टारडमचा अभिमान नाही. माझ्याकडे तसं काहीही नाही. अनेकदा आम्ही सेटवर जमिनीवर बसून जेवायचो. मी अनेकदा सेटवर काम करणाऱ्या लोकांसोबत बसून जेवलो आहे. मला या गोष्टींची काही हरकत नाही.’ संजय दत्त म्हणाला की, अधिकाऱ्यांना वाटलं होतं की, एक सेलिब्रिटी म्हणून त्याला सवयीच्या असलेल्या चैनीच्या गोष्टी काढून घेतल्यास त्याचा उत्साह खचेल, पण या सगळ्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. कारण मी खचून गेलो नाही. त्यांना आश्चर्य वाटलं. ते पूर्णपणे थक्क झाले. त्यांनी माझी चेष्टा केली. त्यांच्यापैकी एक जण माझ्याकडे येऊन म्हणाला, ‘तुला इथे सिगारेट मिळणार नाही. आता तू काय करणार?’ मी त्यावर म्हटलं, ‘सर, तुम्हाला इथे विड्या नक्कीच मिळतील.’ अभिनेता पुढे म्हणाला, ‘या बदलांचा माझ्यावर अजिबात परिणाम झाला नाही, त्यामुळे मी इतका साधा कसा आहे हे पाहून ते गोंधळून गेले होते.’
दरम्यान, संजय दत्तच्या कामाबद्दल सांगायचं तर अभिनेता शेवटचा अक्षय कुमार, अर्शद वारसी, सुनील शेट्टी, जॅकलिन फर्नांडिस, रविना टंडन आणि दिशा पटानी यांच्यासोबत ‘वेलकम टू द जंगल’मध्ये दिसला होता. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळालं.