2 दिवस ड्रग्समुळे बेशुद्ध अवस्थेत झोपलेला हा अभिनेता, जाग येताच घरातील नोकराच्या डोळ्यातील अश्रूंनी बदललं आयुष्य

बॉलिवूडच्या या अभिनेत्याला होतं प्रचंड ड्रग्सचं व्यसन. एकदा घेतलं अन् दोन दिवस झोपेतून उठलाच नाही. उठताच नोकराला मागितलं जेवण. त्याच्या डोळ्यात अश्रू पाहून बदललं नशीब. कोण आहे हा अभिनेता?

2 दिवस ड्रग्समुळे बेशुद्ध अवस्थेत झोपलेला हा अभिनेता, जाग येताच घरातील नोकराच्या डोळ्यातील अश्रूंनी बदललं आयुष्य
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 30, 2026 | 7:18 PM

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आपल्या कारकिर्दीत ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘वास्तव’, ‘खलनायक’, ‘साजन’, ‘अग्निपथ’ आणि ‘केजीएफ: चॅप्टर 2’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांत अविस्मरणीय भूमिका साकारल्या. पडद्यावर दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या संजय दत्तचं वैयक्तिक आयुष्य मात्र अनेक चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. व्यसनाधीनतेपासून तुरुंगवासापर्यंत अनेक संकटांचा सामना करत त्याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे.

1971 मध्ये ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटातून त्याने बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘रॉकी’ या चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनील दत्त यांनी केलं होतं. ‘रॉकी’च्या यशानंतर संजय दत्त लोकप्रिय झाला, मात्र याच काळात आई नरगिस दत्त यांच्या निधनामुळे त्याला मोठा मानसिक धक्का बसला. याच दरम्यान तो अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेला. स्वतः संजय दत्तने अनेक मुलाखतींमध्ये या काळातील अनुभव सांगितला आहे.

दोन दिवसांनंतर जागा झालेला संजय

एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, एकदा तो इतका अमली पदार्थांच्या प्रभावाखाली होता की तब्बल दोन दिवस सतत झोपून राहिला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने घरातील नोकराकडे जेवण मागितलं. मात्र, त्यावेळी नोकराच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण विचारल्यावर त्याने सांगितलं की, दोन दिवस तो जागाच झाला नव्हता. त्यामुळे घरातील सर्वजण घाबरले होते आणि काही अनर्थ घडला की काय, अशी भीती त्यांना वाटत होती. त्या घटनेने संजय दत्तला स्वतःच्या आयुष्याची खरी जाणीव झाली आणि व्यसनामुळे आपण मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहोत हे त्याच्या लक्षात आलं.

यानंतर त्याने वडील सुनील दत्त यांच्याकडे मदत मागितली. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्याने उपचार घेतले आणि हळूहळू अमली पदार्थांच्या व्यसनातून पूर्णपणे बाहेर पडण्यात यश मिळवलं.

संजय दत्तच्या आयुष्यात वादही कमी नव्हते. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला न्यायालयीन लढा द्यावा लागला. या प्रकरणात त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. 2016 मध्ये शिक्षा पूर्ण करून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत यशस्वी पुनरागमन करत आपल्या अभिनयाची छाप कायम ठेवली. संघर्ष, चुका, त्यातून घेतलेला धडा आणि पुन्हा उभं राहण्याची जिद्द यामुळे संजय दत्तचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us