
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने रायाजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत संतोषने सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता अक्षय खन्नाशी बोललोच नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावरून त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगवर खुद्द संतोषने स्वत:ची बाजू मांडली होती. आता ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाचे सीन्स व्हायरल होत असताना नेटकऱ्यांना पुन्हा एकदा संतोष जुवेकरची आठवण आली आहे. ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाचा एक सीन तुफान व्हायरल होत आहे. या सीनमध्ये तो एका अरबी गाण्यावर त्याच्याच खास अंदाजात डान्स करताना दिसत आहे. या क्लिपची तुफान चर्चा होत असतानाच ‘संत्याने याला इग्नोर केलं म्हणे’ असं लिहित नेटकऱ्यांनी मीम्स व्हायरल केले आहेत.
‘आता तरी बघ ना संत्या’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आता जेव्हा जेव्हा अक्षय खन्ना सुपरहिट होईल तेव्हा संत्या तुझी आठवण काढल्याशिवाय महाराष्ट्र गप्प बसणार नाही’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘तू जोपर्यंत बघत नाहीस तोपर्यंत तो फेमस होत राहणार’, अशीही मस्करी एका नेटकऱ्याने केली. ‘मी बघितलाच नाही, बघूच शकतं नाही’, असा संतोष जुवेकरचा डायलॉगसुद्धा अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिला आहे.
‘छावा’ या चित्रपटाच्या सेटवर काम करण्याचा अनुभव सांगताना संतोष जुवेकर एका मुलाखतीत म्हणाला होता, “चित्रपटात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत, त्या कोणाशीच मी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा मी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो आणि निघालो. त्यांच्या बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण मी त्याच्याकडे बघितलंच नाही. माझा त्याच्यावर काही वैयक्तिक राग नाही. पण मला त्याच्याशी बोलावंसं वाटलं नाही.”
या ट्रोलिंगनंतर संतोषने आपली बाजू मांडली होती. “अक्षय खन्ना हा माझाही आवडता अभिनेता आहे. आता ट्रोल झालोय म्हणून असं बोलतोय असं नाहीये. लोक म्हणतील की आता सारवासारव करायला आला. पण लोक अर्धवट गोष्टी ऐकतात किंवा मला जे बोलायचं होतं ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं”, असं जुवेकर म्हणाला होता.