मुलाचं निधन, अतीव दु:ख.., त्या सीनच्या वेदना ‘धुरंधर’च्या अभिनेत्रीच्या मनात राहिल्या कायम

'धुरंधर' या चित्रपटात अक्षय खन्नाच्या पत्नीची भूमिका साकारलेली अभिनेत्री सौम्या टंडनने सोशल मीडियावर पडद्यामागील काही फोटो शेअर केले. सौम्याच्या या दृश्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. याविषयी तिने खास पोस्ट लिहिली आहे.

मुलाचं निधन, अतीव दु:ख.., त्या सीनच्या वेदना धुरंधरच्या अभिनेत्रीच्या मनात राहिल्या कायम
Saumya Tandon
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 22, 2025 | 11:38 AM

रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होताच संपूर्ण देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. सध्या थिएटर आणि सोशल मीडिया.. सर्वत्र ‘धुरंधर’चीच क्रेझ पहायला मिळतेय. या चित्रपटाची कथा आणि त्यातील कलाकारांचं दमदार अभिनय याचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. या चित्रपटातील अनेक सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका सीन हा अभिनेत्री सौम्या टंडन आणि अक्षय खन्ना यांचा आहे. या अत्यंत भावनिक सीनमध्ये सौम्या अक्षयच्या कानाखाली मारते. या सीनचे फोटो शेअर करत आता सौम्याने पडद्यामागची गोष्ट सांगितली आहे. सीन खराखुरा वाटावा म्हणून अक्षयच्या कानाखाली जोरदार वाजवल्याचा खुलासा सौम्याने केला.

सौम्या टंडनची पोस्ट-

पहिल्या फोटोबद्दल सौम्याने लिहिलं, ‘चित्रपटातील हा माझा एण्ट्री सीन आहे आणि या सीनला प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम पाहून मी भारावले आहे. या सीनमध्ये मला एकाच वेळी सर्व भावना जाणवल्या. आमच्या मुलाच्या मृत्यूचं कारण ठरल्याबद्दल माझ्या पतीबद्दलचा राग, असहाय निराशा आणि आम्हा दोघांमधील अतीव दु:ख. आदित्यने तो सीन अस्सल वाटला पाहिजे असा आग्रह धरल्यामुळे मी अक्षयच्या क्लोज-अप शॉटदरम्यान त्याच्या एकदा खरोखरच कानाखाली वाजवली होती. मी काहीतरी युक्ती करून ते टाळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते शक्य झालं नाही. माझ्या भावनिक उद्रेकाचा क्लोज-अप शॉट एकाच टेकमध्ये शूट झाला.’

दुसऱ्या फोटोच्या पडद्यामागची गोष्ट सांगताना तिने पुढे लिहिलं, ‘माझ्या मुलाच्या निधनानंतरची ही शोकसभा होती. त्या क्षणी मला झालेली वेदना माझ्या मनात घर करून राहिली. ती भावना थेट हृदयातून आली होती.’

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’मध्ये भारतीय गुप्तहेर हमजाची कथा दाखवण्यात आली आहे. जो रेहमान डकैतच्या गँगमध्ये शिरून पाकिस्तानमध्ये अंडरकव्हर म्हणून राहतो. 2001 मधील संसदेवरील हल्ला आणि 26/11 चा मुंबई हल्ला यांसारख्या खऱ्या घटनांपासून प्रेरित या चित्रपटाची कथा भारत-पाकिस्तानमधील संघर्षावर आधारित आहे. या स्पाय थ्रिलरमध्ये रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात कमाईचा 700 कोटींचा टप्पा पार केला आहे.