ममता बॅनर्जींविरोधात मीम्स बनवणं पडलं महागात; युट्यूबरवर झाली ‘ही’ कारवाई

| Updated on: Sep 27, 2022 | 7:45 PM

7 युट्यूबर्सविरोधात कारवाई; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भाषणावरून पोस्ट केले मीम्स

ममता बॅनर्जींविरोधात मीम्स बनवणं पडलं महागात; युट्यूबरवर झाली ही कारवाई
Mamta Banerjee
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- सोशल मीडियावर सध्या मीम्सचा (Memes) ट्रेंडच आहे. एखादी व्यक्ती किंवा एखाद्या घटनेवरून हास्यास्पद मीम्स बनवून ते सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. हेच मीम्स नंतर तुफान व्हायरल होतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावरून मीम बनवणं एका युट्यूबरला चांगलंच महागात पडलं आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर आक्षेपार्ह मीम बनवल्याच्या आरोपाखाली नादियातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांच्या सप्रेशन अँड इंटेलिजन्स ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी 30 वर्षीय तुहिन मंडल याला अटक केली. तुहिन हा युट्यूबर (Youtuber) आहे. नादिया इथल्या ताहेरपूरमधून त्याला अटक झाली.

तुहिनचा मोबाइलसुद्धा जप्त करण्यात आला आहे. सागर दास नावाच्या एका व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या युट्यूबरवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणावरून सोशल मीडियावर अपमानास्पद मीम्स बनवल्याचा आरोप आहे. गोराचंद रोड इथे राहणाऱ्या 22 वर्षीय सागर दासने सोमवारी याविरोधात तक्रार दाखल केली होती.

सागर यांनी त्यांच्या तक्रारीत इतरही अनेक युट्यूब चॅनल्सचा उल्लेख केला आहे. “या चॅनल्सनी आर्थिक लाभ मिळाला यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विविध भाषणांना अपमानास्पद पद्धतीने मांडला. अशा आक्षेपार्ह मीम्समुळे राज्यातील विविध भागात हिंसेच्या घटना घडू शकतात”, असं तक्रारीत म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

सोमवारी पोलिसांनी ‘टिकटॉक प्रचेता’, ‘टोटल फन बांग्ला’, ‘रेया प्रिया’, ‘सागरिका वर्मन व्लॉग्स’, ‘लाइफ इन दुर्गापूर’, ‘द फ्रेंड्स कॅम्पस’, ‘पूजा दास 98’ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मंगळवारी कोलकाता पोलिसांच्या इंटेलिजन्स ब्रांचने परुआ परिसरात छापेमारी केली. या कारवाईदरम्यान तुहिनला अटक करण्यात आली. त्याचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला. तुहिनविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच आरोपाखाली काही दिवसांपूर्वी रोडदुर रॉय यालाही अटक करण्यात आली होती. पोलिसांनी गोव्यात त्याला अटक केली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.