Jawan | शाहरुख खानचा जबरा फॅन; चक्क व्हेंटिलेटरवर पोहोचला थिएटरमध्ये

शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाची तुफान क्रेझ चाहत्यांमध्ये पहायला मिळतेय. आपल्या लाडक्या कलाकाराचा चित्रपट पाहण्यासाठी एक जबरा फॅन व्हेंटिलेटरवर थिएटरमध्ये पोहोचला होता. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jawan | शाहरुख खानचा जबरा फॅन; चक्क व्हेंटिलेटरवर पोहोचला थिएटरमध्ये
शाहरुखचा 'जवान' पाहण्यासाठी चाहता पोहोचला व्हेंटिलेटरवर
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 15, 2023 | 12:26 PM

मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचे केवळ देशभरातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. त्याचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. काही जण ढोल-ताशे घेऊन थिएटरबाहेर जल्लोष करू लागले होते. अशातच शाहरुखच्या एका ‘जबरा फॅन’ने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. गंभीर आजारी असूनही हा चाहता आपल्या लाडक्या कलाकाराचा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचला आहे. व्हेंटिलेटरवर थिएटरमध्ये पोहोचलेल्या या चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित गुप्ता नावाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने इन्स्टाग्राम हँडलवर संबंधित चाहत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. शाहरुखचा हा ‘जबरा फॅन’ फक्त चित्रपट पहायलाच आला नाही तर त्याने किंग खानच्या ॲक्शन सीन्सवर प्रतिक्रियाही दिली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘जवान’ हा चित्रपट पुढील काही दिवसांत कमाईचे नवे विक्रम रचणार असल्याची शक्यता आहे. अटली दिग्दर्शित या चित्रपटाचा हा दुसरा आठवडा आहे. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी या चित्रपटाने 19 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘जवान’ने प्रदर्शनाच्या दिवशीच तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई केली होती. पुढील काही दिवसांत ‘जवान’ हा शाहरुखच्याच ‘पठाण’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. पठाणने देशभरात 543 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर ‘जवान’च्या जगभरातील कमाईच्या आकड्याने 660 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

पहा व्हिडीओ

‘जवान’ची गेल्या सहा दिवसांतील कमाई

  • पहिला दिवस- 75 कोटी रुपये
  • दुसरा दिवस- 53.23 कोटी रुपये
  • तिसरा दिवस- 77.83 कोटी रुपये
  • चौथा दिवस- 80.01 कोटी रुपये
  • पाचवा दिवस- 32.92 कोटी रुपये
  • सहावा दिवस- 26 कोटी रुपये

शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाला समिक्षकांनी चार ते पाच स्टार्स रेटिंग दिले आहेत. किंग खानसोबतच या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज आहे. नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, एजाज खान, सुनील ग्रोवर, गिरीजा ओक, लहर खान, संजीता चॅटर्जी यांच्याही भूमिका आहेत.