Sharad Kapoor : जे आवडतं ते कर, मी तुला…शाहरुखचं शरद कपूरला वचन, अभिनेत्यासाठी देवदूत ठरणार बॉलिवूडचा किंग खान
Sharad Kapoor On Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शरद कपूरच्या मदतीला धावून आला आहे. त्याबद्दल शरदनं कृतज्ञता व्यक्त केली आहे.

बॉलिवूड अभिनेता शरद कपूर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण परिस्थितीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यानं चित्रपटसृष्टीतील लोकांकडे काम मिळवून देण्याची विनंती केली होती. त्याच्या या आवाहनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले आहेत. आता अभिनेता शाहरुख खाननेही त्याला फोन करून मदतीचा हात पुढे केल्याचं शरदने सांगितलं आहे.
शाहरुख खानबद्दल काय म्हणाला शरद कपूर?
‘नवभारत टाइम्स’शी झालेल्या संभाषणात शरदनं सांगितलं की, त्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर शाहरुख खाननं त्याला स्वतः फोन केला होता. शरद म्हणाला, ‘शाहरुख खान म्हणाला, ‘तुला जे आवडतं आणि जे करायचे आहे, ते कर, मी तुला मदत करायला तयार आहे.’ मी लवकरच आर्यन खानला भेटणार आहे, असंही शरदने सांगितलं.
शरदनं सोनू सूदकडून मिळालेल्या मदतीबद्दलही सांगितलं. सोनू सूदनं त्याच्या पायाच्या दुखापतीवर उपचारांसाठी वैद्यकीय तज्ज्ञांची एक टीम उपलब्ध करून दिली आहे. शरदनं सांगितलं की, तो उपचारांसाठी कर्जत येथे जाणार आहे.
शरदनं ‘जोश’ चित्रपटात शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव आणि त्या काळात त्यांच्यात असलेलं नाते यावरही भाष्य केलं. शरद म्हणाला, ‘आमचं नातं खूप चांगलं होते. जेव्हा शाहरुख एखाद्या डायलॉग दरम्यान अडकायचा, तेव्हा मी त्याला मदत करायचो. मला एक चांगला चित्रपट बनवायचा होता आणि शाहरुख एक अतिशय आत्मविश्वासू अभिनेता आहे, तो खूप मोठा माणूस आहे.’
शरद कपूरच्या कठीण काळात केवळ शाहरुख आणि सोनू सूदच नव्हे, तर सलमान खान, अमिताभ बच्चन, संजय दत्त यांसारख्या कलाकारांनीही त्याच्याशी संपर्क साधला. संजय दत्तनं त्याला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आणि पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. याशिवाय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याची विचारपूस केल्याचं शरदनं सांगितलं.
शरद कपूरची अभिनय कारकीर्द
शरद कपूरने आपल्या कारकिर्दीत ‘दस्तक’, ‘तमन्ना’, ‘जोश’, ‘खौफ’, ‘एलओसी कारगिल’, ‘लक्ष्य’ आणि ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जोश’ चित्रपटातील प्रकाश शर्माच्या भूमिकेमुळे त्याला विशेष ओळख मिळाली. मात्र, वैयक्तिक आयुष्यातील काही अडचणींमुळे तो अभिनयापासून दूर गेला होता. आता पुन्हा एकदा काम करण्याची त्याची इच्छा आहे.