शाहरुख खानची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

आयपीएलच्या पहिल्या क्वालिफाय सामन्यात आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी काल शाहरुख खान अहमदाबादला पोहोचला होता. या दरम्यान आता अशी बातमी समोर आलीये की त्याला उष्माघाताचा त्राल झाला आहे. ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शाहरुख खानची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
| Updated on: May 22, 2024 | 6:51 PM

अभिनेता शाहरुख खान याला उष्माघाताचा त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाहरुख खानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल आयपीएलच्या केकेआर विरुद्ध हैदराबाद सामन्यात शाहरुखच्या मालकीची टीम केकेआरचा विजय झाल्याने तो मैदानात चाहत्यांना अभिवादन करताना दिसला होता. दरम्यान आज शाहरुख खानला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अहमदाबादच्या केडी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे.

शाहरुख खान आयपीएल 2024 क्वालिफायर 1 मध्ये त्याच्या टीम केकेआरला सपोर्ट करण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचला होता. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपल्या टीमसाठी चिअर अप करताना दिसला होता.

काल अहमदाबादमध्ये तापमान जास्त होते. अशा परिस्थितीत हवामान खात्याने देखील नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. शाहरुख खानची प्रकृती उष्माघातामुळे बिघडल्याने त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

शाहरुख खान IPL 2024 क्वालिफायर 1 सामन्यात त्याचा मुलगा अबराम आणि मुलगी सुहाना खानसोबत केकेआरने सामना जिंकल्यानंतर टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे.