
शाहरुख खान आणि गौरी खानची प्रेमकहाणी ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रेमकथांपैकी एक आहे. जेव्हा शाहरुख खान गौरी छिब्बरच्या प्रेमात पडला तेव्हाच त्याने गौरीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला गौरीने फारसा रस दाखवला नाही, तरी शाहरुख खानने अखेर तिचं मन जिंकलंच. पण शाहरूखच्या पुढे खरं आव्हान होतं ते गौरीच्या कुटुंबाचं. कारण होतं ते वेगवेगळ्या धर्माबद्दल. शाहरुख मुस्लिम आणि गौरी हिंदू असल्याने गौरीच्या घरच्यांचा त्यांच्या नात्याला विरोध होता.
गौरीच्या घरच्यांचा होता विरोध
दरम्यान गौरीच्या घरच्यांचा एवढा विरोध होता की तिच्या घरातील एका व्यक्तीला शाहरूखला मारण्याची इच्छा होती. तो व्यक्ती म्हणजे गौरीचा भाऊ विक्रांत छिब्बर. एकदा फराह खानच्या शोमध्ये, गौरीचा भाऊ विक्रांत छिब्बरने खुलासा केला की त्याला शाहरुखचे पाय तोडायचे होते.
या व्यक्तीला का मारायचं होतं शाहरूखला?
शोमध्ये फराहने विक्रांतला विचारले, “तुम्हाला माहित होते का शाहरुख तुमच्या बहिणीवर प्रेम करत होता ते?” विक्रांतने उत्तर दिले, “हो, मला संशय आला होता. कोणीतरी मला सांगितले की तो शाहरुख आहे.” फराहने मग विचारले, “तर तू काय केलेस?” विक्रांत हसला आणि म्हणाला, “मला खात्री होती की तो तोच आहे. तो लाल रंगाचे शॉर्ट्स घालून फुटबॉल खेळायचा. जेव्हा तो गोल करण्यासाठी धावायचा तेव्हा मला त्याला मारण्याची इच्छा होत असे!” हे ऐकून फराहने शाहरुखला विचारले, “तुम्हाला माहित होते का तो गौरीचा भाऊ आहे?” शाहरुखने विनोदाने म्हटले, “हो, म्हणूनच मी फक्त पाच गोल केले, नाहीतर मी 20 गोल केले असते!” शाहरुखचे उत्तर ऐकून सेटवरचे सर्वजण हसायला लागतात.
शाहरुख-गौरीची लव्हस्टोरी कशी सुरु झाली.
शाहरुख आणि गौरीची प्रेमकहाणी 1984 मध्ये दिल्लीतील एका पार्टीपासून सुरु झाली होती. त्यावेळी शाहरुख 18 वर्षांचा होता आणि गौरी 14 वर्षांची होती. त्यांच्या कुटुंबियांच्या खूप विरोधानंतर अखेर त्यांनी लग्न केलं. 25 ऑक्टोबर 1991 रोजी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही रितीरिवाजांनुसार दोघांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर शाहरुखने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले. आणि पाहता पाहता तो सुपरस्टार झाला. आज गौरी अन् शाहरूखची जोडीही तेवढीच सुपरहीट आहे.