
अभिनेत्री शेफाली जरीवालाचं वयाच्या 42 व्या वर्षी कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. शेफालीच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. 27 जून रोजी तिच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे ती दिवसभर उपाशी होती. रात्री शेफालीने फ्रीजमधला फ्राइड राइस खाल्ला आणि त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यावेळी तिचा पती पराग त्यागी त्यांच्या पाळीव श्वानाला फिरायला घेऊन गेला होता. घरातील कर्मचाऱ्याने शेफालीच्या प्रकृतीबद्दलची माहिती देताच तो घरी परतला आणि त्याने तिला रुग्णालयात नेलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी परागची कसून चौकशी केल्याची माहिती शेफालीची मैत्रीण पूजा घईने दिली. “सुदैवाने शेफालीच्या शवविच्छेदन अहवालात कोणतीच संशयास्पद बाब आढळली नाही”, असंही तिने स्पष्ट केलं. शेफालीचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट अद्याप जाहीर करण्यात आला नाही.
विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली, “चांगली गोष्ट ही आहे की शवविच्छेदन अहवालात कोणताच गैरप्रकार आढळला नाही. माझी एकच भीती होती की परागला अशा परिस्थितीतही पोलिसांच्या चौकशीला, त्यांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. त्याला या क्षणी एकटं राहायचं आहे, पण पोलिसांच्या चौकशीसंदर्भात त्याला सहकार्य करावंच लागेल. अर्थात तेसुद्धा त्यांची ड्युटी करत आहेत. पण याआधी मी इतर केसेस पाहिले आहेत. कित्येक महिन्यांपर्यंत चौकशी सुरू असते. सुदैवाने शेफालीचा पोर्ट मॉर्टम रिपोर्ट क्लिअर आहे.”
शेफाली तिच्या आरोग्याविषयी आणि लूक्सविषयी अत्यंत सजग असायची, असाही खुलासा पूजाने या मुलाखतीत केला. परंतु आदल्या दिवशी तिने आयव्ही ड्रीप घेतली होती, असंही तिने सांगितलं. “आपण काय खातोय आणि कोणती ट्रीटमेंट घेतोय, याबद्दल शेफाली खूप सजग असायची. तिच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींबद्दलही ती खूप काळजी घ्यायची. त्यासाठी ती कोणत्याही अशिक्षित माणसाची कधीच मदत घेणार नाही. शेफालीच्या अचानक निधनानंतर तिचे कुटुंबीय पूर्णपणे खचले आहेत. तिच्या आईला रुग्णालयात घेऊन जावं लागलं होतं. पराग तर पूर्णपणे सुन्न होता,” असं ती पुढे म्हणाली.
याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. निधनाच्या दिवशी सकाळी शेफालीने अँटी एजिंगची औषधं घेतल्याचंही म्हटलं गेलंय. ज्यामुळे तिच्या रक्तादाबावर परिणाम झाल्याचा अंदाज वर्तवला गेला. “प्राथमिकदृष्ट्या, यात कोणताही गैरप्रकार नाही. मृत्यूच्या कारणाबद्दल डॉक्टरांनी त्यांचं मत राखून ठेवलं आहे”, असं झोन 9 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम म्हणाले.