
अनेक बॉलिवूड अभिनेत्री लग्नानंतर इंडस्ट्री सोडून परदेशात स्थायिक झाल्याचं पाहायाला मिळालं. अशीच एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जिने लग्नानंतर इंडस्ट्री सोडली आणि पतीसह परदेशात स्थायिक झाली.एवढंच नाही तर तिने परदेशात एका सलूनमध्येही काम केलं. या अभिनेत्रीने स्वत: एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली आहे.
न्यूझीलंडमध्ये हेअरड्रेसर बनली आणि सलूनमध्ये काम केले.
ही अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर. अभिनेत्री 90 च्या दशकात खूप लोकप्रिय होती. तिची बहीण नम्रता शिरोडकर प्रमाणेच, शिल्पानेही चित्रपटांमध्ये नाव कमावण्याचा विचार केला बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिने 1989 मध्ये चित्रपटांमध्ये प्रवेश केला. तिने अनेक हिट चित्रपट दिले, परंतु 2000 मध्ये तिने लग्न केले आणि चित्रपटांपासून दूर होत पतीसहपरदेशात स्थायिक झाली. शिल्पा शिरोडकरने बँकर अपरेश रणजीतशी लग्न केले. तिने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये याबद्दल सांगितले. तिने असेही सांगितले की चित्रपट सोडल्यानंतर ती न्यूझीलंडमध्ये हेअरड्रेसर बनली आणि सलूनमध्ये काम केले.
हेअर ड्रेसिंगचा कोर्सही केला
लग्नानंतर शिल्पा शिरोडकर तिच्या पतीसोबत प्रथम नेदरलँड्स आणि नंतर न्यूझीलंडला शिफ्ट झाली. तिने गौहर खानच्या पॉडकास्टमध्ये सांगितले की तिथे राहून तिने हेअर ड्रेसिंगचा कोर्स करण्याचा विचार केला. शिल्पाने असेही सांगितले की तिने तिच्या पतीला तिचा सीव्ही बनवण्यासही सांगितला होता. शिल्पा शिरोडकरने न्यूझीलंडमध्ये हेअरड्रेसरची नोकरी स्वीकारली.शिल्पा म्हणाली, ‘स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी मी न्यूझीलंडमध्ये हेअरड्रेसिंगचा कोर्स केला. हे काम माझ्या अभिनय कारकिर्दीच्या जवळचे होते, ज्यामध्ये मेकअप आणि इतर गोष्टींचा समावेश होता. कोर्सनंतर मी दोन महिने एका सलूनमध्ये काम केले.’
नंतर नोकरी का सोडावी लागली?
शिल्पा पुढे म्हणाली, ‘आमचे नुकतेच लग्न झाले होते आणि हेअरड्रेसिंगचे काम खूप कठीण होते. तो ( अपरेश रणजीत ) आठवड्याच्या शेवटी सुट्टी घेत असे आणि मलाही त्याच दिवशी काम करावे लागत असे. आम्हाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ हवा होता’
काही नोकऱ्यांसाठी अर्ज केला आणि मुलाखतीसाठीही गेली
नंतर शिल्पा शिरोडकरने हेअरड्रेसरची नोकरी सोडली आणि नंतर तिच्या पतीला तिचा बायोडाटा तयार करण्यास सांगितले. जेव्हा तिच्या पतीने तिला बायोडाटामध्ये काय लिहायचे असे विचारले तेव्हा शिल्पा म्हणाली, ‘खोटे लिहू नको. खरं लिही. मी दहावीत नापास झाले आहे आणि चित्रपटांमध्ये मी जे काम केले आहे तेही लिही.’ शिल्पाने सांगितले की त्याच दिवशी तिने काही नोकऱ्यांसाठी अर्ज केला आणि मुलाखतीसाठीही गेली. जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिच्या हातात दोन नियुक्ती पत्रे होती.
प्रेग्नंसी आणि आरोग्याच्या समस्या
शिल्पाने डन अँड ब्रॅडस्ट्रीटमध्ये क्रेडिट कंट्रोलर म्हणून काम करायला सुरुवात केली, पण त्याच काळात तिला कळले की ती प्रेग्नंट आहे. शिल्पा शिरोडकरसाठी हा आनंद फार मोठा होता. तिचा नवराही खूप आनंदी होता. शिल्पाने सांगितले की, ती अनेक आरोग्य समस्यांशी झुंजत असतानाही तिने तिच्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान काम केले. शिल्पाच्या मते, तिला दिवसातून तीन वेळा इन्सुलिन घ्यावे लागत असे. त्यानंतर तिने 20 किलो वजन कमी केले. शिल्पा शिरोडकर ‘ बिग बॉस 18 ‘ मध्येही दिसली.