कडक, हेच हवंय..; शिवानी सोनारच्या नव्या मालिकेची जोरदार चर्चा, प्रोमोवर कमेंट्सचा वर्षाव

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनार एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तारिणी' असं या मालिकेचं नाव असून झी मराठी वाहिनीवर ती लवकरच प्रसारित होणार आहे.

कडक, हेच हवंय..; शिवानी सोनारच्या नव्या मालिकेची जोरदार चर्चा, प्रोमोवर कमेंट्सचा वर्षाव
Shivani Sonar as Tarini
Image Credit source: Instagram
Updated on: Jul 21, 2025 | 2:00 PM

झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘तारिणी’. मुंबईत राहणाऱ्या तारिणी बेलसरेची ही कथा आहे. तारिणीची आई पोलिस खात्यात हेड कॉन्स्टेबल होती. अत्यंत प्रामाणिक.. पण तिच्यावर लाच घेतल्याचे आरोप केले गेले. अखेर तिच्या आईने भीतीपोटी आत्महत्या केली, असं दाखवलं गेलं. तारिणीच्या वडिलांनी तेव्हा मुलीच्या भविष्याचा विचार करत दुसरं लग्न केलं. तारिणीची सावत्र आई मात्र घरात येताच क्षणी त्या हेड कॉन्स्टेबलचा उल्लेखही घरात करायचा नाही असं सगळ्यांना सांगितलंय. पण आपली आई चुकीचं कधीच वागू शकत नाही हा विश्वास तारिणीला आहे. म्हणूनच आपल्या आईचं सत्य आणि खऱ्या गुन्हेगाराला जगापुढे आणण्यासाठी तारिणी पोलिसांत भरती झाली.

तिच्यासोबत केदार नावाचा एक मुलगा आहे, ज्याचा निशाणा कधीच चुकत नाही. जशी तारिणी तिच्या आईच्या गुन्हेगाराचा शोध घेत आहे, तसा केदार त्याला आणि त्याच्या आईला सोडून गेलेल्या वडिलांचा शोध घेत आहे. दोघं एकमेकांसाठी आधार आहेत. केदारच्या मनात तारिणीविषयी प्रेमाची भावना आहे, पण तो तिला आजवर सांगू शकला नाही. तिच्यासमोर प्रेम व्यक्त करू शकला नाही.

अशाच वेळी मीडिया टायकून खांडेकरांच्या घरात तारिणी आणि केदार राहू लागतात. काय असं घडलं असेल की त्यांना खांडेकरांच्या घरात प्रवेश करावा लागतो? तारिणीचं खांडेकरांच्या घरात शिरण्यामागचं कारण काय असेल? खांडेकरांच्या घरात तारिणीच्या आईच्या गुन्हेगाराचे धागेदोर सापडणार का? ज्यामुळे तारिणी आणि केदारमध्ये दुरावा येईल का? अशा प्रश्नासोबत ही मालिका सुरू राहते.

या मालिकेचं कथा आणि पटकथालेखन प्रल्हाद कुडतरकर यांनी केलंय. तर पूर्णानंद वांढेकर मालिकेचे संवादलेखक आहेत. या मालिकेचं दिग्दर्शन भीमराव मोरे करतायत. तर मालिकेचे निर्माते एरिकॉन टेलिफिल्म्सचे शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई आहेत. ‘तारिणी’ ही मालिका येत्या 11 ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.