‘शूटआऊट ॲट वडाला’च्या दिग्दर्शकाचं निधन; मध्यरात्री किचनमध्ये घसरून पडले अन्..

'कांटे', ‘शूटआउट ॲट वडाला’, ‘जज्बा’, ‘काबिल’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांचं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. घरातील किचनमध्ये पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

शूटआऊट ॲट वडालाच्या दिग्दर्शकाचं निधन; मध्यरात्री किचनमध्ये घसरून पडले अन्..
दिग्दर्शक, निर्माते संजय गुप्ता
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 31, 2026 | 12:08 PM

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक संजय गुप्ता यांचं वयाच्या 57 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाला’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या संजय गुप्ता यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मिळालेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास ते घरातील किचनमध्ये पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांची पत्नी आणि दोन मुलंही घरीच होते, पण हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. नेमकं काय घडलं, हे कोणालाही कळलं नाही, अशी माहिती समोर येत आहे.

त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर. खान यांनीही संजय गुप्ता यांना श्रद्धांजली वाहिली. संजय गुप्ता यांच्याकडे प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान होतं, अशा शब्दांत त्यांनी आठवणींना उजाळा दिला.

Loading...

‘कांटे’मुळे मिळाली विशेष ओळख

संजय गुप्ता यांनी 1994 मध्ये ‘आतिश’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र, 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांटे’ या चित्रपटामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, कुमार गौरव आणि लकी अली यांसारखे दिग्गज कलाकार होते. क्राइम, ॲक्शन आणि गँगस्टर कथांना वेगळ्या शैलीत मांडण्याची त्यांची खासियत होती. ‘कांटे’मधील दमदार संवाद, ॲक्शन सीन्स आणि कलाकारांची फळी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

‘कांटे’नंतर संजय गुप्ता यांनी ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’, ‘शूटआउट ॲट वडाला’, ‘जज्बा’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘काबिल’ चित्रपटही विशेष गाजला होता. त्यांच्या चित्रपटांमध्ये मुंबईतील गुन्हेगारी विश्व, अंडरवर्ल्ड, सूड आणि मैत्री अशा विषयांचं प्रभावी चित्रण पाहायला मिळालं.

काही वर्षांपूर्वी पुणे ते मुंबई प्रवास करताना संजय गुप्ता एका गंभीर अपघातातून बचावले होते. त्यावेळी ते दुखापतग्रस्त झाले होते, पण अखेरीस ते बरे झाले. संजय गुप्ता यांनी अनु लेखी यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांचा नंतर घटस्फोट झाला होता. मात्र 2009 मध्ये त्यांनी पुन्हा एकमेकांशी लग्न केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us