सिस्टमविरोधात बोललो तर..; भावाचं निधन अन् NEET पेपर लीकवर प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
'साराभाई व्हर्सेस साराभाई'मध्ये रोशेषच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या राजेश कुमारच्या या खुलाशामुळे NEET पेपरफुटीचा विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम पुन्हा चर्चेत आला आहे.

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’मध्ये रोशेषची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता राजेश कुमार सध्या एका भावनिक खुलाशामुळे चर्चेत आला आहे. NEET पेपरफुटी प्रकरणाचा आपल्या कुटुंबाला किती मोठा फटका बसला, याबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. भावाचं निधन, पुतणीचं विस्कटलेलं आयुष्य आणि परीक्षेच्या व्यवस्थेतील अनियमितता यामुळे संपूर्ण कुटुंबाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, व्यवस्थेविरोधात आवाज उठवल्यास कलाकारांना काम मिळणं बंद होऊ शकतं, अशी भीतीही राजेशने व्यक्त केली आहे.
भावाच्या निधनानंतर 13 व्या दिवशी पुतणीची परीक्षा
राजेश कुमारने निधी वासंदानी यांच्या पॉडकास्टमध्ये आपल्या कुटुंबासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्याच्या चुलत भावाच्या मुलीने NEET परीक्षेत चांगले गुण मिळवले होते. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी तिचे वडील तिला वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी घेऊन गेले होते. मात्र, या प्रवासादरम्यान त्याच्या भावाचं निधन झालं. एकीकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, तर दुसरीकडे NEET परीक्षेतील पेपरफुटीचं प्रकरण समोर आलं. या प्रकरणामुळे परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याचा निर्णय झाला. परिणामी, वडिलांना गमावलेल्या मुलीला अवघ्या 13 दिवसांत पुन्हा परीक्षेला सामोरं जावं लागलं.
राजेशने सांगितलं की, भावाच्या निधनानंतर तेराव्या दिवशीच पुतणीची पुन्हा परीक्षा होती. त्यासाठी तो स्वतः विमानाने दिल्लीला गेला आणि तिला परीक्षा केंद्रावर घेऊन गेला. वडिलांच्या निधनाचं दुःख आणि भविष्याची चिंता अशा दुहेरी संकटाचा सामना ती करत होती.
200 गुणांचा फरक; अभिनेत्याने व्यक्त केला संताप
राजेशने सांगितलं की, पहिल्या परीक्षेतील निकाल आणि पुन्हा झालेल्या परीक्षेच्या निकालात तब्बल 200 गुणांचा फरक होता. तिच्यासाठी पुन्हा एक वर्ष तयारी करणंही सोपं नव्हतं. कारण आता तिच्या डोक्यावर वडिलांचं छत्रही नव्हतं. या प्रसंगामुळे राजेशने परीक्षा व्यवस्थेतील अनियमिततेवर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी मेहनत करून भविष्य घडवण्याची स्वप्नं पाहायची आणि व्यवस्थेतील चुकीमुळे त्यांचं आयुष्यच विस्कळीत व्हायचं, हे कितपत योग्य आहे? असा सवाल त्याने उपस्थित केला.
‘सिस्टमविरोधात बोललात तर काम मिळणार नाही’
या मुलाखतीत राजेशने आणखी एक धक्कादायक अनुभव सांगितला. NEET प्रकरणावर आवाज उठवण्याची इच्छा व्यक्त केली असता एका निर्मात्याने त्याला सावध केलं होतं. व्यवस्थेविरोधात बोलणाऱ्या कलाकारांना काम देऊ नये, अशा सूचना काही सरकारी विभागांकडून येतात, असं त्या निर्मात्याने सांगितल्याचा दावा राजेशने केला. त्यामुळे कलाकारांवर किती दबाव असतो, हेही त्याने स्पष्ट केलं. मात्र, CJP सारख्या व्यासपीठामुळे अनेकांना आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य मिळाल्याचं त्याने सांगितलं.
याच मुलाखतीत राजेशने राजकारणावरही भाष्य केलं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेता विजय यांच्याबद्दल बोलताना, ते देशाचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात, असं मत त्याने व्यक्त केलं. तरुण पिढीच्या अपेक्षा आणि विचारांशी विजय यांची भूमिका जुळत असल्याचंही तो म्हणाला.
