Shraddha Murder Case: श्रद्धाची निर्घृण हत्या करणाऱ्या आफताबविरोधात कविता कौशिकचं खवळलं रक्त

'यापेक्षा दुसरी शिक्षा असूच शकत नाही'; दिल्ली हत्येप्रकरणी कविता कौशिकचं ट्विट चर्चेत

Shraddha Murder Case: श्रद्धाची निर्घृण हत्या करणाऱ्या आफताबविरोधात कविता कौशिकचं खवळलं रक्त
श्रद्धा मर्डर केसप्रकरणी अभिनेत्री कविता कौशिकने व्यक्त केला तीव्र संताप
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 16, 2022 | 10:55 AM

मुंबई- दिल्लीतील श्रद्धाच्या हत्येप्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आफताब पूनावाला याने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या केली. या घटनेविरोधात देशभरात आक्रोश व्यक्त होतोय. सोशल मीडियावर अनेकजण राग व्यक्त करत आहेत. आफताबने केलेल्या कृत्यासाठी त्याला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली जात आहे. आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकने या हत्येप्रकरणी ट्विट केलं आहे. आफताबला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी कविताने केली आहे.

वसईची श्रद्धा वॉकर ही दिल्लीत प्रियकर आफताब पूनावालासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. आफताबने तिची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. हे तुकडे त्याने मेहरौलीच्या जंगलात विविध ठिकाणी फेकले. तब्बल सहा महिन्यांनंतर हे सत्य समोर आलं. हे प्रकरण ऐकून अनेकांच्या अंगावर काटा आला.

या दोघांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. म्हणून मुंबई सोडून आफताब आणि श्रद्धा दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहत होते. मे 2022 मध्ये आफताबने श्रद्धाची हत्या केली. हत्येनंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे केले. या तुकड्यांना ठेवण्यासाठी त्याने नवीन फ्रीजदेखील खरेदी केला होता.

‘या मुलाला फासावर लटकवलं पाहिजे. अशा गुन्ह्यासाठी दुसरी कुठली शिक्षाच असू शकत नाही’, असं ट्विट कविता कौशिकने केलं. अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट करत राग व्यक्त केला.

‘या अत्यंत भयानक, निर्घृण प्रकरणासाठी काही शब्दच नाहीत. त्या मुलीसाठी मला खूप वाईट वाटतंय. ज्या व्यक्तीवर तिने प्रेम केलं आणि विश्वास ठेवला, त्यानेच तिची हत्या केली. याप्रकरणी पोलीस तातडीने तपास करत आरोपीला कठोर शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे’, अशा शब्दांत स्वराने राग व्यक्त केला.