
अभिनेत्री शुभांगी अत्रेनं तब्बल 10 वर्षांनंतर ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेला रामराम केला. टेलिव्हिजनवरील ही सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत आधी अभिनेत्री शिल्पा शिंदे ही अंगुरी भाभीच्या भूमिकेत होती. परंतु निर्मात्यांसोबत काही वाद झाल्याने तिने अचानक मालिका सोडली होती. त्यानंतर शुभांगी अत्रेनं अंगुरी भाभी साकारून तितकंच प्रेम मिळवलं. आता शुभांगीने ही मालिका सोडल्यानंतर पुन्हा एकदा शिल्पा त्यात पुनरागमन करतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगीने मालिका सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. यावेळी तिने शिल्पावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत शुभांगीने सांगितलं की ‘भाभीजी 2.0’ या नव्या सिझनमधून बाहेर पडण्याचं सर्वांत प्रमुख कारण म्हणजे रोजच्या त्याच-त्याच आयुष्यातून बाहेर पडणं आणि नवीन संधी शोधणं. “मी या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा निर्मात्यांसोबत सर्व व्यवस्थित चर्चा केली होती. त्यावरून कोणालाही कुठलीही समस्या नव्हती. सर्वकाही परस्पर संमतीने आणि आदरपूर्वक झालं होतं. आपण एकच गोष्ट किती वेळापर्यंत करायची? मालिकेतून बाहेर पडायचा विचार मी स्वत: बऱ्याच काळापासून करत होती. अभिनेत्री म्हणून मला आणखी संधी शोधायच्या होत्या. कारण ही वेळ पुन्हा येत नाही. ही दहा वर्षे मी खूप चांगलं काम केलं”, असं शुभांगी म्हणाली.
मालिकेविषयी बोलताना शुभांगीने अप्रत्यक्षपणे शिल्पाला टोमणाही मारला. “मालिकेच्या सिझनच्या अखेरपर्यंत मी काम करेन, असं वचन मी निर्मात्यांना दिलं होतं. हा सिझन पूर्ण करूनच मी बाहेर पडेन, असं ठरवलं होतं. या मालिकेत मी जशी आले होते अभिमानाने आणि सन्मानाने, त्याच पद्धतीने मी मालिकेला एका ठराविक स्थानापर्यंत पोहोचून जातेय. माझं हे वचन मी पूर्ण केलं”, असं शुभांगी म्हणाली. शिल्पाने ही मालिका मध्येच सोडली होती.
याआधी ‘टेली चक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिंदे म्हणाली होती, “जेव्हा या मालिकेवरून वाद सुरू होता, तेव्हासुद्धा एक अभिनेत्री म्हणून मी हे म्हटलं होतं की तिने काम चांगलं केलंय. ती चांगली अभिनेत्री आहे, परंतु कॉमेडी सर्वांनाच जमत नाही. त्यापुढेही जाऊन एखाद्याला कॉपी करणं तर आणखीच कठीण असतं. प्रचंड दबाव असतो.”