तुझ्यात सभ्यतेची कमतरता..; मालिकेतल्या ‘श्रीकृष्णा’ने मराठमोळ्या अभिनेत्रीला सुनावलं, प्रकरण काय?
मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून घराघराच पोहोचलेला अभिनेत्री सौरभ राज जैन याने एका मराठमोळ्या अभिनेत्री सुनावलं आहे. इन्स्टा स्टोरीवर भलीमोठी पोस्ट लिहित सौरभने या अभिनेत्रीला फटकारलं आहे. हे नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या..

‘भाभीजी घर पर है’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचा नवीन भाग ‘भाभीजी घर पर है 2.0’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यामध्ये अंगुरी भाभीच्या रुपात तब्बल दहा वर्षांनंतर अभिनेत्री शिल्पा शिंदेचं कमबॅक होणार आहे. या मालिकेत आधी शिल्पाच अंगुरी भाभीची भूमिका साकारत होती. परंतु निर्मात्यांशी काही वाद झाल्यानंतर तिने अचानक ही मालिका सोडली होती. त्यानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रेनं तिची जागा घेतली होती. आता पुन्हा एकदा मालिकेत शुभांगीच्या जागी शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिल्पाला या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. परंतु तेवढंच प्रेम शुभांगीलाही मिळालं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा शिल्पाने शुभांगीवर निशाणा साधला, तेव्हा एका प्रसिद्ध अभिनेत्याला तिचा प्रचंड राग आला.
मालिकांमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारून लोकप्रिय बनलेला अभिनेता सौरभ राज जैनने अप्रत्यक्षपणे शिल्पावर टीका केली आहे. शुभांगीच्या कामाबद्दल शिल्पाने केलेली टिप्पणी त्याला अजिबात आवडली नाही. इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित सौरभने शिल्पाला चांगलंच सुनावलं आहे.
सौरभ जैनची पोस्ट-
‘मालिकेत रिप्लेस (बदललेल्या) केलेल्या अभिनेत्रीने जवळपास 10 वर्षांपर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि या संपूर्ण प्रवासात प्रेक्षकांनीही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आता कोणत्याही कारणास्तव जेव्हा पहिली अभिनेत्री पुन्हा त्याच भूमिकेत परततेय, जी भूमिका तिने दहा वर्षांपूर्वी कोणत्यातरी कारणांसाठी सोडली होती, ती मीडियाला सांगतेय की बदललेली अभिनेत्री तिच्याइतकी मोठी नाही आणि तिच्यात विनोदाच्या टायमिंगची कमतरता आहे’, असं त्याने लिहिलंय.

या पोस्टमध्ये त्याने पुढे म्हटलंय, ‘नाही मॅडम, तुझ्यात मूलभूत सभ्यतेची कमतरता आहे.. IYKYK (If you know you know म्हणजेच जर तुम्हाला माहित असेल, तर तुम्हाला माहित आहे.) ही गोष्ट मी का शेअर करतोय.. तर ही माझ्यासाठी आणि माझ्यासारखा विचार करणाऱ्यांसाठी एक शिकवण आहे. विनम्रताच महत्त्वाची आहे, बाकी सर्व काही क्षणभंगुर आहे.’
नेमकं काय म्हणाली होती शिल्पा?
‘टेली चक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिंदे म्हणाली होती, “जेव्हा या मालिकेवरून वाद सुरू होता, तेव्हासुद्धा एक अभिनेत्री म्हणून मी हे म्हटलं होतं की तिने काम चांगलं केलंय. ती चांगली अभिनेत्री आहे, परंतु कॉमेडी सर्वांनाच जमत नाही. त्यापुढेही जाऊन एखाद्याला कॉपी करणं तर आणखीच कठीण असतं. प्रचंड दबाव असतो.”
