
अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या केपटाऊनमध्ये आहे. ती तिथे खतरों के खिलाडी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. श्वेतानं तिच्या कारकीर्दीत अनेक कामं केली आहेत. तिचा अभिनयसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. वैयक्तिक आयुष्यात श्वेता दोन मुलांची आई (Palak and Reyansh) आहे आणि ती वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उत्तम संतुलन राखते.

आता टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना श्वेतानं आपल्या मुलांबद्दल सांगितलं- 'रात्री आम्ही व्हिडीओ कॉल करुन झोपतो जेणेकरून आम्ही उठल्यावर एकमेकांना पाहू शकू.’ ती पुढे म्हणाली जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळते तेव्हा आम्ही बोलतो. मी प्रत्येक स्टंटच्या आधी आणि नंतर माझ्या मुलीशी बोलते जेणेकरुन मी सांगू शकते की मी किती घाबरले होते.

आपल्या कामाबद्दल पुढे बोलताना ती म्हणाली- 'खरं तर, आपल्या सर्वांसाठी हा एक कठीण काळ आहे. मी माझ्या मुलांबरोबर आणि कुटूंबियांसोबत घालवलेल्या वेळेबद्दल कृतज्ञ आहे.

काम करणं किती महत्त्वाचे आहे हे माझ्या लक्षात आलं. जर काम थांबलं तर सर्व काही थांबतं. आपलं उत्पन्न थांबेल, परंतु खर्च कदाचित थांबणार नाहीत. तुम्हाला ईएमआय आणि इतर खर्च द्यावे लागतील. म्हणूनच काम करणं महत्वाचं होतं.

वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर तिचा पती अभिनव कोहलीबरोबरचा वाद अनेकदा चर्चेत असतो. अभिनव आणि श्वेतानं एकमेकांवर बरेच आरोप केले होते. यावर श्वेता म्हणाली- 'प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यातील अडचणींचा सामना करावा लागतो. चढ उतार हा जीवनाचा एक भाग आहे. आणि जर आपण आपलं ध्येय, जबाबदाऱ्या आणि प्राधान्यक्रम बाजूला ठेवत अडचणींचा सामना करत असाल तर आयुष्यात सुंदर वाटेल. माझ्यासाठी माझी मुलं पहिले आहेत.