‘जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत..’; ट्रोलर्सवर भडकला सिद्धार्थ चांदेकर

| Updated on: Apr 22, 2024 | 10:00 AM

पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज साकारतात पण खऱ्या आयुष्यात मात्र मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवलंय, असं म्हणत नेटकऱ्यांनी चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या कुटुंबीयांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. या टीकेनंतर चिन्मयने मोठा निर्णय जाहीर केला आहे.

जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत..; ट्रोलर्सवर भडकला सिद्धार्थ चांदेकर
सिद्धार्थ चांदेकर, चिन्मय मांडलेकर
Image Credit source: Instagram
Follow us on

मुलाच्या ‘जहांगीर’ या नावावरून ट्रोलिंग होत असल्याने अभिनेता चिन्मय मांडलेकरने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असं त्याने म्हटलंय. त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रविवारी चिन्मयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओच्या माध्यमातून तो मुलाच्या नावावरून होत असलेल्या ट्रोलिंगविषयी व्यक्त झाला. मुलाचं नाव ‘जहांगीर’ का ठेवलं, यावरून नेटकरी चिन्मय आणि त्याच्या कुटुंबीयांना ट्रोल करत आहेत. या ट्रोलिंगला वैतागून अखेर चिन्मयने हा निर्णय घेतला आहे. त्याने हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती चाहत्यांकडून होत आहे. तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आपल्या मनातली घाण बाहेर काढणं हाच ट्रोलर्सचा धर्म आणि हाच त्यांचा उद्योग’, असं म्हणत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही चिन्मयला निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.

सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट-

जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या लोकांना महाराजांशी किंवा त्यांच्या विचारांशी काहीही देणं घेणं नाही. आपल्या मनातली घाण बाहेर काढणं हाच त्यांचा धर्म आणि हाच त्यांचा उद्योग. तू महाराजांची भूमिका खूप निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे केली आहेस आणि कलाकार म्हणून आम्ही सगळेच त्यासाठी तुझा आदर करतो. ही भूमिका करणं थांबवू नकोस. प्लीज! आम्ही सगळे तू, नेहा आणि जहांगीरच्या बरोबर आहोत’, असं सिद्धार्थ चांदेकरने लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

‘धुरळा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी चिन्मयचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, ‘हे खूप जास्त दुर्दैवी आहे. आम्ही सगळे तू, नेहा आणि जहांगीरच्या बरोबर आहोत. एक नक्की आहे की महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाट्टेल तसं बोलणाऱ्या ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी आणि शिकवणीशी काहीही देणंघेणं नाहीये. त्यांना ते माहीत असतील असंही मला वाटत नाही. चिन्मय एक मित्र म्हणून, कलाकार म्हणून विनंती करतो की हा निर्णय मागे घे आणि ज्या श्रद्धेने तू महाराजांची भूमिका करतोस ती करत राहा.’

सर्वसामान्य नेटकऱ्यांनीहीह चिन्मयला हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना तरी हे पटेल का? चिन्मय यांनी काही चुकीचं केलं नाही. नावावर जाऊ नका तर त्याच्या शिकवणीकडे बघा. महाराजांनी विविध जाती-धर्माच्या लोकांना जवळ केलं होतं. आता सुमारे 400 वर्षांनंतर आपण अशा गोष्टीवर भांडत आहोत’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.