
दाक्षिणात्या अभिनेता सिद्धार्थ त्याच्या बेधडक स्वभावासाठी ओळखला जातो. आमिर खानच्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटानंतर तो बॉलिवूडमध्येही प्रकाशझोतात आला. विविध मुद्द्यांवर मोकळेपणे मतं मांडल्याने अनेकदा सिद्धार्थ चर्चेत येतो. मात्र टीका किंवा ट्रोलिंगमुळे तो स्वभावातील स्पष्टवक्तेपणा दाखवण्यात अजिबात कचरत नाही. नुकत्याच पार पडलेल्या ‘हैदराबाद लिटररी फेस्टिव्हल’मध्ये सिद्धार्थ चित्रपटसृष्टीतील विविध पैलूंबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. या फेस्टिव्हलमध्ये सिद्धार्थची पत्नी अदिती राव हैदरीची आई आणि प्रसिद्ध गायिका, लेखिका विद्या रावसुद्धा सहभागी झाल्या होत्या. या दोघांमध्ये रंगलेली चर्चा एका टप्प्यावर पुरुषत्वाच्या विषयावर येऊन पोहोतली. ज्या भूमिकांमधून नकारात्मक पुरुषत्व ठळकपणे अधोरेखित होतं, तशा भूमिका थेट नाकारल्याचं सिद्धार्थने सांगितलं. मात्र यामुळे व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरलेला हिरो म्हणून यश मिळत नसल्याचीही कबुली त्याने दिली.
“माझ्याकडे असेही स्क्रिप्ट्स आले होते, ज्यामध्ये मी महिलांच्या कानाखाली वाजवतोय, आयटम साँग करततोय, एखाद्या महिलेच्या कमरेला चिमटा काढतोय किंवा काय करायचं, कुठे जायचं हे महिलेला सांगतोय. मी अशा स्क्रिप्ट्सना थेट नकार दिला. अर्थातच जर माझा स्वभाव असा नसता तर मी आतापर्यंत खूप मोठा स्टार असतो. मला जे आवडतं, तेच काम करण्यावर मी अधिक भर दिला. आज माझ्याकडे लोक येऊन सांगतात की, मी महिलांसोबत आदरपूर्वक वागलो, मी आईवडिलांसोबत चांगला वागलो, मी लहान मुलांसोबत नीट राहिलो आणि त्यामुळे मी क्युट दिसलो. त्यांची मुलं माझे 15 वर्षांपूर्वीचेही चित्रपट पाहू शकतात. ही भावना खूपच समाधान देणारी आहे”, असं तो म्हणाला.
याविषयी त्याने पुढे सांगितलं, “ही भावना मी कोट्यवधींच्या कमाईच्या आकड्यात मोजू शकत नाही, माझ्याभोवती असलेली प्रत्येक व्यक्ती आक्रमक बनवण्याचा प्रयत्न करत होती. मर्द को दर्द नहीं होता, वगैरे दाखवणाऱ्या असंख्य भूमिका होत्या. पण मला ऑनस्क्रीन रडायला आवडतं.” गेल्या वीस वर्षांत सिद्धार्थने नेहमीच्या त्याच-त्याच भूमिका सोडून चौकटीबाहेरच्या व्यक्तीरेखा साकारण्याला प्राधान्य दिलं. ‘रंग दे बसंती’मधील त्याच्या भूमिकेचंही प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं होतं.