अग्गंबाई सासूबाई! कियाराच्या लग्नाबाबत अखेर सिद्धार्थ मल्होत्राच्या आईने सोडलं मौन; म्हणाली..

आजपासून (5 फेब्रुवारी) कियारा-सिद्धार्थच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यासाठी शनिवारी या दोघांसह त्यांचे कुटुंबीय, मेकअप आर्टिस्ट, फॅशन डिझायनर आणि इतर पाहुणे जैसलमेरला रवाना झाले.

अग्गंबाई सासूबाई! कियाराच्या लग्नाबाबत अखेर सिद्धार्थ मल्होत्राच्या आईने सोडलं मौन; म्हणाली..
Kiara and Sidharth
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 05, 2023 | 1:48 PM

जैसलमेर: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे येत्या 6 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये अत्यंत शाही पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडणार आहे. आजपासून (5 फेब्रुवारी) कियारा-सिद्धार्थच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यासाठी शनिवारी या दोघांसह त्यांचे कुटुंबीय, मेकअप आर्टिस्ट, फॅशन डिझायनर आणि इतर पाहुणे जैसलमेरला रवाना झाले. शनिवारी जैसलमेरच्या एअरपोर्टवर सिद्धार्थची आई, मोठा भाऊ हर्षद आणि त्याच्या पत्नीला पाहिलं गेलं. यावेळी एअरपोर्टवर पापाराझींनी सिद्धार्थ मल्होत्राच्या आईला शुभेच्छा दिल्या आणि लग्नाविषयी प्रतिक्रिया विचारली.

सिद्धार्थच्या आईने पापाराझींनी दिलेल्या शुभेच्छांचा आनंदाने स्वीकार केला आणि सर्वांचे आभार मानले. त्यापैकी एका पापाराझीने त्यांना विचारलं, “कियारा अडवाणी तुमची सून होणार आहे. तुम्हाला कसं वाटतंय?” त्यावर त्या म्हणाल्या, “आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत.” यावेळी सिद्धार्थच्या मोठ्या भावानेही आनंद व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र त्यावर अद्याप कुटुंबीयांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. शनिवारी कियाराला फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासोबत जैसलमेरला जाताना पाहिलं गेलं. त्याच्या काही तासांनतर सिद्धार्थसुद्धा त्याच्या कुटुंबीयांसोबत जैसलमेरला पोहोचला.

सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी जवळपास 80 हून अधिक आलिशान रुम्स बुक करण्यात आले आहेत. मेहंदी, हळद आणि संगीताचा कार्यक्रम आजपासून (5 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. या लग्नसोहळ्याला 100 ते 125 पाहुणे उपस्थित असतील. त्यात शाहिद कपूर, मीरा राजपूत, करण जोहर, वरुण धवन यांसारख्या सेलिब्रिटींचाही समावेश आहे.

सिद्धार्थ आणि कियाराची पहिली भेट ही निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत झाली. ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त करण जोहरन पार्टी आयोजित केली होती. तेव्हा दोघं पहिल्यांदा भेटल होते. या पहिल्या भेटीतच दोघांची एकमेकांशी चांगली मैत्री झाली होती. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. हे दोघं गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.