Jubin Nautiyal: प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालला दुखापत; रुग्णालयात केलं दाखल

गायक जुबिन नौटियालच्या हात, कोपर अन् डोक्याला लागला मार; जाणून घ्या तब्येतीचे अपडेट्स

Jubin Nautiyal: प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालला दुखापत; रुग्णालयात केलं दाखल
Jubin Nautiyal
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 02, 2022 | 1:33 PM

मुंबई: प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल गुरुवारी पहाटे इमारतीच्या जिन्यांवरून पडला. यानंतर त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिन्यांवरून पडल्याने जुबिनच्या कोपर, बरगड्या आणि डोक्याला दुखापत झाली आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी जुबिनवला मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. यावेळी त्याच्या कोपराला फ्रॅक्चरची पट्टी बांधलेली दिसली.

गेल्या आठवड्यात जुबिनने दुबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केलं होतं. त्याचं नवीन गाणं ‘तू सामने’ हे नुकतंच प्रदर्शित झालंय. गायिका योहानीसोबत मिळून त्याने हे गाणं रेकॉर्ड केलंय. गुरुवारी योहानी आणि जुबिनने मिळून हे गाणं लाँच केलं. त्यानंतरच त्याला दुखापत झाली. जिन्यांवरून पडताना उजव्या हाताला अधिक मार लागल्याने डॉक्टरांनी काही दिवस त्याला उजव्या हातावर अधिक ताण न देण्याचा सल्ला दिला आहे.

जुबिन नौटियालने बॉलिवूडमध्ये बरीच हिट गाणी गायली आहेत. यामध्ये रातां लंबियाँ, तुम ही आना, बेवफा तेरा मासूम चेहरा, लुट गए हमनवा मेरे यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

सप्टेंबर महिन्यात जुबिन त्याच्या एका कॉन्सर्टमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. अमेरिकेतील जुबिनच्या लाइव्ह कॉन्सर्टचा आयोजक जयसिंग हा भारताचा वॉन्टेड गुन्हेगार असल्याचं म्हटलं जात होतं. तर काहींनी जयसिंगवर खलिस्तानचं समर्थन केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या जुबिनच्या कॉन्सर्टचं पोस्टर त्याच्यासाठी अडचणीचं ठरलं होतं.