
कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता यावा यासाठी आमिर खानने ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटानंतर काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून तो पुनरागमन करत आहे. येत्या 20 जून रोजी त्याचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर तो ओटीटीवर कधी येणार याची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु आमिरने ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. यामुळे हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. इतकंच नव्हे तर त्याने ओटीटीची तब्बल 120 कोटी रुपयांची डीलसुद्धा नाकारली आहे.
कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या आठ आठवड्यांनंतर तो ओटीटीवर रिलीज केला जातो. जे प्रेक्षक थिएटरमध्ये चित्रपट पाहू शकत नाहीत, ते ओटीटीवर त्याच्या स्ट्रीमिंगची प्रतीक्षा करतात. परंतु बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरने काहीतरी वेगळाच विचार केला आहे. तो ओटीटीवर नाही तर थेट युट्यूबवर हा चित्रपट अपलोड करणार आहे. परंतु हेसुद्धा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतर होणार आहे. आता युट्यूब म्हटलं की अनेकांना हा चित्रपट मोफत पहायला मिळणार, असं वाटलं असेल. परंतु युट्यूबवरही पैसे भरून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आमिरने याविषयी माहिती दिली. “आम्ही ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित करणार नाही. सितारे जमीन पर हा चित्रपट फक्त थिएटरमध्ये येईल. माझ्यासमोर अॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी जरी कोट्यवधींची डील ठेवली, तरी माझा नकारच असेल”, असं त्याने स्पष्ट केलं. चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटाने दिलेल्या माहितीनुसार, आमिरने आधीच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओची 120 कोटी रुपयांची डील नाकारली आहे. आमिर नेहमीच प्रवाहाविरुद्ध काम करण्याचा विचार करतो. त्यामुळे ओटीटीला नकार देण्यामागेही त्याचा काहीतरी खास विचार असेल, असं म्हटलं जात आहे.
‘सितारें जमीन पर’ या चित्रपटात आमिरसोबत अभिनेत्री जिनिलिया डिसूझा मुख्य भूमिकेत आहे. या दोघांसोबत दहा दिव्यांग मुलांनीही भूमिका साकारल्या आहेत. आमिर या चित्रपटात कोचच्या भूमिकेत आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमींन पर’ या चित्रपटाचा हा पुढचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे.