
बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध अभिनेता म्हणून गोविंदाकडे पाहिले जाते. अनोखी डान्स शैली आणि अभिनयाने गोविंदाने अनेकांची मने जिंकली आहेत. त्याचे लाखो चाहते आहेत. आता ९०च्या दशकातील एका अभिनेत्रीने गोविंदाबाबत मोठा खुलासा केला आहे. ही अभिनेत्री कोण आहे? काय म्हणाली चला जाणून घेऊया…
९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम खानने नुकतेच आपल्या चित्रपट कारकीर्दीच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला. तिने सांगितले की, गोविंदाच्या पाठिंब्यामुळे तिला स्टेज परफॉर्मन्स आणि नृत्याची भीती दूर करण्यात कशी मदत झाली. ती गोविंदासोबत अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. सोनम खानने आपल्या कारकीर्दीत प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीला तिने ऋषि कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज स्टार्ससोबत काम केले होते. कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना तिने अभिनय सोडून लग्न केले. आता ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने गोविंदासोबतचा आपला अनुभव शेअर केला आहे.
गोविंदा हात धरून नृत्य शिकवायचा
सोनमने इन्स्टाग्रामवर गोविंदासोबतचा एक जुना फोटो शेअर केला, ज्यामध्ये दोघेही कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. या फोटोसोबत तिने एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले की गोविंदासोबत नेहमीच एक खास नातं राहिलं आहे. सोनमने लिहिलं की, ‘गोविंदा जी मला नेहमी म्हणायचे – ‘तू अगदी माझ्यासारखी आहे.’ कदाचित याचं कारण असावं की आम्ही दोघेही अतिशय साध्या पार्श्वभूमीतून आलो होतो. आम्ही एकत्र अनेक चित्रपट केले आणि मला आजही आठवतं की ते माझा हात धरून मला नृत्य शिकवायचे. यामुळे नृत्यदिग्दर्शक थोडे चिडायचे, कारण त्यांना नवीन कलाकारांसोबत संबंध ठेवायला आवडत नव्हतं.’
आजपर्यंत त्यांच्यासारखा स्टार पाहिला नाही
सोनमने पुढे सांगितलं की, जेव्हा त्यांनी इंडस्ट्रीत सुरुवात केली तेव्हा त्यांनी ३०हून अधिक चित्रपट साइन केले होते. पण त्यांना नृत्य अजिबात येत नव्हतं. त्यांच्याकडे सरावासाठी वेळही नव्हता, कारण शूटिंगचं वेळापत्रक खूप व्यस्त होतं. तरीही गोविंदा प्रत्येक सीनच्या आधी त्यांना स्वतः नृत्याच्या स्टेप्स शिकवायचे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवायचे. सोनम यांनी पुढे लिहिलं, ‘गोविंदा सर जितके मोठे स्टार आहेत, तितकेच नम्र आणि मदत करणारे व्यक्तीही आहेत. माझ्या कारकीर्दीत त्यांच्यापेक्षा जास्त नम्र आणि सच्चा सहकलाकार मला भेटला नाही. ते खरंच एकमेव आहेत आणि त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.’
सोनम खान आणि गोविंदाने एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामध्ये ‘बाज’, ‘अपमान की आग’, ‘आसमान से ऊँचा’ आणि ‘रईसजादा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्या ‘अजूबा’ चित्रपटात दिसल्या होत्या.