सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान मोठा गोंधळ, कार्यक्रम अर्धवट थांबवला

मात्र आता सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्ट दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यावेळीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान मोठा गोंधळ, कार्यक्रम अर्धवट थांबवला
sonu nigam 1
| Updated on: Mar 25, 2025 | 10:31 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक सोनू निगम याच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याचे गाणे ऐकण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी लहान मुले, वृद्ध माणसं तसेच तरुण वर्ग कायमच गर्दी करत असतात. मात्र नुकत्याच झालेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टमध्येही दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे सोनू निगमला अर्धवट कार्यक्रम थांबवावा लागला.

सोनू निगमने दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीतील (डीटीयू) ‘इंजीफेस्ट 2025’  या कार्यक्रमाला हजेरी लावली. रविवारी रात्री हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला. सोनू निगम गाणं गात असताना काही उत्साही चाहत्यांनी स्टेजवर बाटल्या आणि दगड फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याला कार्यक्रम अर्धवट थांबवावा लागला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

सोनू निगमचा लाईव्ह कॉन्सर्ट दिल्लीतील टेक्निकल युनिव्हर्सिटीतच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एक लाखांहून अधिक विद्यार्थी जमले होते. यावेळी सोनूने ‘तुमसे मिलके दिल का जो हाल’ हे लोकप्रिय गाणे गाण्यास सुरुवात केली. हे गाणं गायला सुरुवात करताच काही विद्यार्थ्यांनी अचानक सोनू निगमच्या स्टेजवर दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केली.

या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. या घटनेनंतर सोनू निगमने शांत राहण्याचे आवाहन केले. “मी तुमच्यासाठी इथे आलो आहे. जेणेकरुन आपल्याला सर्वांना चांगला वेळ घालवता येईल. मी तुम्हाला आनंद घेऊ नका असे म्हणत नाही, पण कृपया असे कृत्य करु नका, असे सोनू निगम म्हणाला. मात्र तरीही विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरुच होता. त्यामुळे त्याने शेवटी कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर घटनेचा तपास सुरु केला. विद्यार्थ्यांनी मस्ती आणि उत्साहातून हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. मात्र नंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. सुदैवाने, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. सध्या कार्यक्रमाच्या आयोजकांकडून या घटनेबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. या घटनेमुळे डीटीयूमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.