
प्रसिद्ध गायक सोनू निगम अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतो. विविध मुद्द्यांवर तो बेधडकपणे आपली मतं मांडतो. अनेकदा यासाठी त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नुकतंच सोनू निगमला एका जुन्या वादामुळे मोठी किंमत चुकवावी लागली आहे. जम्मू-काश्मीरमधल्या श्रीनगर इथं त्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. श्रीनगरमध्ये सोनूचा हा पहिलाच कॉन्सर्ट होता. त्यामुळे चाहत्यांची मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात घडलं वेगळंच. जवळपास आठ वर्षांपूर्वी सोनू निगमने केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याच्या कॉन्सर्टला फार कमी लोकं पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. सोनूने अजानविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे त्याला तेव्हा बऱ्याच टीकांचा सामना करावा लागला होता.
आता सोशल मीडियावर सोनू निगमचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अजानदरम्यान कॉन्सर्ट थांबवल्याचं पहायला मिळत आहे. “कृपया मला दोन मिनिटं द्या, इथे अजान सुरू होणार आहे”, अशी विनंती तो उपस्थितांना करतो. हे ऐकताच उपस्थित प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात आणि त्याच्या या निर्णयाचं कौतुक करतात. अजान संपल्यानंतर सोनू पुन्हा गायला सुरुवात करतो आणि कार्यक्रमाला पुढे नेतो.
एकीकडे सोनूच्या या निर्णयाचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे त्याच्या कॉन्सर्टमधील कमी प्रेक्षकसंख्येची चर्चादेखील होत आहे. श्रीनगरमधील दल सरोवराजवळील इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु अनेकांनी सोनू निगमच्या या कॉन्सर्टवर बहिष्कार करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे अनेक जागा रिकाम्यात राहिल्या होत्या. “संपूर्ण हॉल प्रेक्षकांनी भरून जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु अनेक खुर्च्या रिकाम्याच राहिल्या”, अशी प्रतिक्रिया एका स्थानिक व्यक्तीने दिली.
2017 मध्ये सोनू निगमने ट्विटरवर एक पोस्ट लिहित लाऊडस्पीकरवर म्हटल्या जाणाऱ्या अजानवरून टीका केली होती. ‘देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लीम नाही, परंतु दररोज सकाळी मला अजानने उठवलं जातं. ही बळजबरीची धार्मिकता कधी संपणार’, असा सवाल त्याने केला होता. त्यानंतर आणखी एका ट्विटमध्ये त्याने लिहिलं होतं, ‘जेव्हा इस्लाम धर्माची सुरुवात झाली, तेव्हा मोहम्मद साहेबांकडे वीज नव्हती. मग आता एडिसननंतर मला हा आवाज का ऐकावा लागतोय? कोणतंही मंदिर किंवा गुरुद्वारा त्या धर्माचा नसलेल्या व्यक्तीला जागं करण्यासाठी विजेचा वापर करत नाही. ही गुंडगिरी आहे.’
वादानंर सोनू निगमच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर हे पोस्ट काढून टाकण्या आले आहेत. परंतु श्रीनगर कॉन्सर्टच्या पार्श्वभूमीवर त्याचे स्क्रीनशॉट्स पुन्हा व्हायरल झाले आणि त्यामुळेच लोकांनी कॉन्सर्टवर बहिष्कार टाकल्याचं म्हटलं जात आहे.