
शेत नांगरणीसाठी बैल नसल्याने लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याने स्वत:लाच औताला जुंपलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने त्यांना बैलांची मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. ‘तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो’, असं ट्विट त्याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर केलं होतं. त्यानंतर एका युजरने त्याच्या मदतीबाबत प्रश्न उपस्थित केला. सोनू सूदची टीम 5 टक्के मदत आणि 95 टक्के पीआर (प्रसिद्धी) करते, असा आरोप संबंधित युजरने केला. या युजरला आता खुद्द सोनू सूदने सडेतोड उत्तर दिलं आहे. लातूरच्या शेतकऱ्याला आर्थिक मदत केल्याची पावती शेअर करत त्याने ट्रोलरचं तोंड बंद केलं आहे.
वृद्ध शेतकऱ्याचा फोटो शेअर करत ट्रोलरने लिहिलं होतं, ‘या शेतकऱ्याचा फोटो तुम्हाला आठवतोय का? अभिनेता सोनू सूदने लिहिलं होतं, तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो. ही गोष्ट नेहमीच माझ्या लक्षात आली की, सोनू भावाची टीम मदत 5% आणि पीआर 95% करते. ज्यांना मदत करायची होती, त्यांनी केली. राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 42,500 रुपयांचं कर्ज स्वत: फेडलंय. तर दुसरीकडे सोनू भावाच्या टीमने फक्त एक्सवर वाहवा मिळवली. जी व्यक्ती आजसुद्धा हाताने शेती करत असेल, त्यांच्याकडे ट्विटर कुठून येईल, हे कोणी मला सांगू शकेल का? असो, सोनू भावाने कोणती मदत केली असेल तर सांगा, तीसुद्धा मी लिहितो.’
मेरे हिस्से की मदद तो मैंने पहले ही हमारे किसान अंबादास भाई की कर दी थी।
अब अपने हिस्से की घास आप भी भेज देना 🙏
क्या है ना भाई, ट्विटर पे ज़हर फैलाने से देश नहीं चलेगा। किसी और को मदद पहुँचाना हो तो मेसेज कर देना 🙏
जय हिन्द 🇮🇳 https://t.co/E3jsMP0w3X pic.twitter.com/WxMd0IxjjW— sonu sood (@SonuSood) July 7, 2025
या ट्विटवर सोनू सूदने स्वत: उत्तर दिलं आहे. आर्थिक मदत केल्याची पावती शेअर करत त्याने सुनावलं, ‘माझ्या वाट्याची मदत तर मी आधीच आपले शेतकरी अंबादास भाऊ यांची केली होती. आता तुमच्या वाट्याचा चारासुद्धा तुम्ही पाठवून द्या. काय आहे ना भाऊ, ट्विटरवर विष पसरवून देश चालणार नाही. इतर कोणाला मदत पाठवायची असेल तर मेसेज कर.’ लातूर जिल्ह्यातल्या हाडोळती इथल्या शेतकऱ्याला सोनू सुदने 45 हजार रुपयांची मदत पाठवली आहे. शेतकरी अंबादास पवार यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाल्याचं ट्विट सोनू सुदने केलं आहे. सोनू सूद या शेतकऱ्याला बैलजोडी घेऊन देणार होता. मात्र अगोदरच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बैलजोडी भेट दिल्याने त्याने 45 हजार रुपये पाठवले आहेत.