Disha Salian: तर मी शिक्षा भोगण्यासही तयार.. दिशा सालियानप्रकरणी सूरज पांचोलीची मोठी भूमिका; आदित्य ठाकरेंबद्दलही स्पष्टच बोलला..
Disha Salian Case: दिशा सालियानप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीने सविस्तर पोस्ट लिहित त्याची बाजू मांडली आहे. या पोस्टमध्ये त्याने बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही, असं त्याने म्हटलंय.

दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियानप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. माझं इन्स्टाग्राम अकाऊंट ब्लॉक होण्यापूर्वी मी हे स्पष्ट करू इच्छितो, असं म्हणत त्याने आपली बाजू मांडली आहे. यापूर्वीही सूरजने दिशा सालियनला आपण कधीही भेटलो नसल्याचं सांगितलं होतं. आता त्याने या प्रकरणावर सविस्तरपणे बोलण्याची इच्छा व्यक्त करत, योग्य व्यासपीठ मिळाल्यावर प्रत्येक प्रश्नाचं थेट आणि प्रामाणिकपणे उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे. सूरजने म्हटलं आहे की, त्याला बोलण्यासाठी एखादा सुशिक्षित आणि जबाबदार पत्रकार किंवा मुलाखतकार हवा आहे. जो त्याच्यासमोर बसून थेट प्रश्न विचारेल. प्रश्न कठीण असोत किंवा अस्वस्थ करणारे असोत, त्यांची उत्तरं देण्यास आपली कोणतीही हरकत नसल्याचं सूरजने स्पष्ट केलं. मात्र, संपूर्ण संवाद तथ्यांच्या आधारे आणि पत्रकारितेची तसेच माणुसकीची जाणीव ठेवून व्हावा, अशी त्याची अपेक्षा आहे.
कॅमेऱ्यामागे लपून प्रश्न विचारणं, प्रतिक्रिया मिळवण्यासाठी पाठलाग करणं किंवा एखाद्याच्या आयुष्याचं तमाशात रूपांतर करणं आपल्याला मान्य नसल्याचं त्याने म्हटलं आहे. सूरजच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून त्याने अनेक गोष्टींवर मौन बाळगलं आहे. त्याच्याबद्दल लोकांनी वेगवेगळे अंदाज बांधले, काही गोष्टी गृहीत धरल्या गेल्या आणि काही गोष्टी माध्यमांमध्ये रिपोर्ट झाल्या. मात्र, त्याच्याशी थेट त्या संदर्भात प्रश्न विचारले गेले नाहीत, असं त्याचं म्हणणं आहे. योग्य संधी मिळाल्यावर तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर थेट, प्रामाणिकपणे आणि कोणतीही भीती न बाळगता देईल, असं त्याने स्पष्ट केलं.
सूरज पांचोलीची पोस्ट-
‘मी हे पुन्हा एकदा सांगतोय आणि मला पुन्हा हेच स्पष्ट करावं लागतंय, कारण वारंवार सांगूनही लोकांना समजत नाहीये की, मी दिशा सालियान किंवा आदित्य ठाकरे यांना माझ्या आयुष्यात कधीच भेटलो नाही. एकदाही नाही, थेट नाही, अप्रत्यक्षही नाही. तरीसुद्धा ऑनलाइन शिवीगाळ थांबत नाहीये. मला वाटेल ते बोललं जातंय आणि जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत आहेत. अशाने मी घाबरेन असं लोकांना वाटतंय. मी घाबरलो नाही. ज्या गोष्टींशी माझा काही संबंधच नाही, अशा प्रकरणांमध्ये माझं नाव गोवल्याचं मी गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे. यामुळे मी माझ्या आयुष्यातील अनेक वर्षे यात वाया घालवली आहेत, जी मला पुन्हा कधीच मिळणार नाहीत. आता जेव्हा मी माझं आयुष्य, करिअर आणि भविष्य पुन्हा नव्याने घडवण्याचा प्रयत्न करत असताना मी शांत बसणार नाही. पुन्हा सगळं तेच तेच घडताना बघणार नाही. जर मी घाबरलो असतो, तर मी इतरांप्रमाणेच शांत राहिलो असतो. पण मी उलट बोलतोय. कारण लपवण्यासारखं आणि पळून जाण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही,’ असं तो म्हणाला.
याविषयी त्याने पुढे लिहिलं, ‘माझं मन स्पष्ट आहे, म्हणून मी माझ्यासाठी उभा आहे. अखेर हे माझं नाव, माझं आयुष्य आणि माझं भविष्य आहे. त्याचप्रमाणे जे मी बघतोय, त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. माझ्यासाठी हे स्पष्ट आहे की, माझं नाव या प्रकरणात ओढण्यामागे आणि माझ्याविरोधात द्वेष निर्माण करण्यामागे काही लोकांचे माझ्या कुटुंबातील सदस्यांशी असलेले काही वाद किंवा प्रश्न कारणीभूत आहेत. ते प्रश्न काहीही असोत, कृपया त्याची शिक्षा मला देऊ नका. माझे कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. माझी कोणतीही राजकीय जवळीक नाही, कोणताही राजकीय अजेंडा नाही आणि कोणाचं संरक्षण करण्याची किंवा कोणावर हल्ला करण्याचीही माझी इच्छा नाही. त्यामुळे मी तपास यंत्रणांना मनापासून फक्त एकच विनंती करू इच्छितो, कृपया या प्रकरणाचा सखोल, संपूर्ण आणि कोणताही विलंब न करता तपास करा.’
पहा पोस्ट-
‘माझा या प्रकरणाशी संबंध असल्याचा किंवा माझा सहभाग असल्याचा अगदी छोटासा पुरावाही समोर आला, तरी कायदा जो काही निर्णय देईल, जी काही शिक्षा ठोठावेल, ती कोणताही प्रश्न न विचारता स्वीकारण्यास मी तयार आहे. पण जर तपास यंत्रणांच्या चौकशीत हे स्पष्ट झालं की माझा या प्रकरणाशी खरोखरच काहीही संबंध नाही, तर माझी तपास यंत्रणांना आणि स्वतःला ‘प्रामाणिक मीडिया’ म्हणवणाऱ्या माध्यमांना विनंती आहे की, हेही तितक्याच स्पष्टपणे आणि ठामपणे लोकांसमोर सांगा. मला आणखी एका गोष्टीचं अत्यंत दुःख होत आहे आणि ती म्हणजे काही माध्यमं ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहेत, ते पाहणं. काही लोकांसाठी हा केवळ मनोरंजनाचा विषय किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळचा चर्चेचा मुद्दा असेल; पण हे माझं आयुष्य आहे. प्रत्येक हेडलाइनमागे, प्रत्येक आरोपामागे आणि प्रत्येक अंदाजामागे एक खरा माणूस आहे, ज्याला त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागू शकतात. कारण मीही एक माणूस आहे. माझ्याही भावना आहेत. माझंही एक आयुष्य आहे. आणि आता मी ते आयुष्य पुन्हा नव्याने उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. मी कोणाची सहानुभूती मागत नाही. कोणी माझी बाजू घ्यावी, अशीही माझी अपेक्षा नाही. मला फक्त पारदर्शकता हवी आहे,’ अशी मागणी सूरजने केली.
या पोस्टच्या अखेरीस त्याने लिहिलं, ‘माझ्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही. खरं सांगायचं तर आता यापेक्षा आणखी काय करू शकतो, हेच मला समजत नाही. मी तपासात पूर्ण सहकार्य केलं आहे. प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. स्वतःला चौकशीसाठी उपलब्ध करून दिलं आहे. कोणत्याही तपासाला सामोरं जाण्यास मी तयार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. माझी फक्त एवढीच विनंती आहे की, सत्य पूर्ण निष्पक्षतेने आणि योग्य पद्धतीने लोकांसमोर आणलं जावं. मला फक्त एका गोष्टीची भीती वाटते, ज्या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही, त्यासाठी माझ्या आयुष्यातील आणखी काही वर्षं वाया जाऊ नयेत. म्हणून कृपया या प्रकरणाचा सखोल तपास करा. लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. आणि जर सत्य हेच असेल की माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, तर कृपया मला शेवटी माझं आयुष्य पुन्हा जगू द्या.’